Happy Birthday Shah Rukh Khan: बॉलिवूड किंग म्हणजेच अभिनेता शाहरुख खान याने आपल्या करिअरमध्ये अनेक मोठे चित्रपट केले आहेत. पण, कधी कधी त्यानेही काही चित्रपट करण्यास नकार दिला होता. कधी शाहरुखला कथानक आवडलं नाही, तर कधी दुसऱ्या चित्रपटांना दिलेल्या तारखांमुळे एखाद्या चित्रपटाला नाकारावे लागले. शाहरुखने केलेले अनेक चित्रपट हिट ठरले. पण, त्याने नाकारलेले काही चित्रपट देखील हिट ठरले होते. चला तर जाणून घेऊया अशाच काही चित्रपटांबद्दल...
'रंग दे बसंती' हा आमिर खानच्या सुपरडुपर हिट ठरलेल्या चित्रपटांपैकी एक चित्रपट आहे. या चित्रपटात आधी शाहरुख खानही दिसणार होता. पण, शाहरुखला आमिर खानची भूमिका ऑफर करण्यात आली नव्हती. या चित्रपटात अभिनेता आर. माधवनला जी भूमिका मिळाली होती, ती शाहरुखला ऑफर करण्यात आली होती. या चित्रपटात माधवनचा कॅमिओ होता. त्याने फ्लाइट लेफ्टनंटची भूमिका साकारली होती.
शाहरुख खान सध्या राजकुमार हिराणी यांच्यासोबत 'डंकी' हा चित्रपट करत आहे. पण, याआधी त्याला राजकुमार हिराणी यांनी '३ इडियट्स'साठी विचारणा केली होती. मात्र, त्यावेळी शाहरुख खानने नकार दिला होता. नंतर हा चित्रपट आमिरला ऑफर करण्यात आला आणि तो त्याच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा हिट चित्रपट ठरला.
आशुतोष गोवारीकर यांचा बिग बजेट 'जोधा अकबर' हा चित्रपट २००८मध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटात अभिनेता हृतिक रोशन मुख्य भूमिकेत दिसला होता. मात्र, या चित्रपटामधील अकबरची भूमिका आधी शाहरुखला ऑफर करण्यात आली होती. त्याच्या नकारानंतर हा चित्रपट हृतिक रोशनकडे गेला.
बॉलिवूडचा 'दबंग' अभिनेता सलमान खान सध्या त्याच्या 'टायगर ३' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. त्याचा हा चित्रपट १२ नोव्हेंबरला रिलीज होत आहे. या चित्रपट शाहरुख खानही कॅमिओ करताना दिसणार आहे. आता 'टायगर' ही चित्रपट मालिक सलमान खान गाजवत असला, तरी या फ्रँचायझीचा पहिला चित्रपट 'एक था टायगर' शाहरुखला ऑफर झाला होता. मात्र, त्यावेळी 'डॉन २' आणि 'जब तक है जान'मध्ये व्यस्त असल्यामुळे त्याने या चित्रपटाला नकार दिला होता.
आशुतोष गोवारीकर यांनी शाहरुख खानला 'लगान' हा चित्रपटही ऑफर केला होता. पण, तेव्हाही शाहरुखने या चित्रपटासाठी नकार दिला. त्यानंतर या चित्रपटात शाहरुख खानची वर्णी लागली. 'लगान' हा चित्रपट इतका हिट झाला की, त्याने ऑस्करवारी देखील केली.