Happy Birthday Rajinikanth: साऊथ इंडस्ट्रीचे सुपरस्टार रजनीकांत यांचा आज (१२ डिसेंबर) वाढदिवस आहे. रजनीकांत आता ७४व्या वर्षात पदार्पण करत आहेत. दाक्षिणात्य भागांमध्ये रजनीकांत यांना 'देवा'प्रमाणे पुजलं जातं. रजनीकांत यांचा चित्रपट रिलीज होतो त्या दिवशी साऊथच्या बऱ्याच ऑफिसना सुट्टी दिली जाते. तर, काही ठिकाणी रजनीकांत यांच्या होर्डिंग्सला दुग्धाभिषेक केला जातो. चाहत्यांमध्ये त्यांची इतकी क्रेझ आहे. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने देखील अनेक ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. रजनीकांत यांनी आपल्या दमदार अभिनयाने सगळ्यांनाच भुरळ घातली आहे. पण रजनीकांत यांच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात कशी झाली हे तुम्हाला माहित आहे का?
सुपरस्टार रजनीकांत यांना वेगळ्या अशा कोणत्याही ओळखीची गरज नाही. त्यांनी आजवर अनेक हिट चित्रपट मनोरंजन विश्वाला दिले आहेत. पण, मनोरंजन विश्वात येण्यापूर्वी त्यांना अनेक प्रकारचे कष्ट सहन करावे लागले होते. त्यांना पहिला चित्रपट कसा मिळाला, या मागे देखील एक किस्सा आहे. 'अपूर्व रंगगंगल' या चित्रपटात रजनीकांत पहिल्यांदा झळकले होते. या चित्रपटात त्यांची सहाय्यक भूमिका होती. त्यांच्या या चित्रपटात अभिनेते कमल हासन यांची मुख्य भूमिका होती. 'अपूर्व रंगगंगल' हा चित्रपट रजनीकांत यांना त्यांच्या मित्रामुळे मिळाला होता.
रजनीकांत यांना लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. मात्र, घरची जबाबदारी अंगावर पडल्याने त्यांना नोकरी करावी लागत होती. अखेर बस कंडक्टर म्हणून काम करत असताना रजनीकांत यांनी आपल्या अभिनयाच्या आवडीचा खूप विचार केला. त्यावेळी रजनीकांत यांच्या बहादूर नावाच्या मित्राने त्यांना फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेण्याचा सल्ला दिला. आपल्या मित्राचा हा सल्ला ऐकून रजनीकांत यांनी देखील अभिनय शाळेत प्रवेश घेतला आणि अभिनयाचे धडे गिरवायला सुरुवात केली आहे.
याच इन्स्टिट्यूटमध्ये शिकत असताना रजनीकांत यांना 'अपूर्व रंगगंगल' या चित्रपटाची ऑफर मिळाली. त्यांनी देखील क्षणाचाही विचार न करता ही ऑफर स्वीकारली. यानंतर रजनीकांत यांनी एकामोमाग एक अनेक हिट चित्रपट द्यायला सुरुवात केली.