Ayodhya Ram Mandir Prana Pratishtha: देशभरात आज अगदी आनंद आणि उत्साहाचं वातावरण आहे. एका मोठ्या संघर्षानंतर अखेर रामजन्मभूमीत पुन्हा एकदा जल्लोषात प्रभू रामाचं स्वागत होणार आहे. आजच रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. यासाठी अयोध्येत एका भव्यदिव्य सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. या भव्य सोहळ्यासाठी आता बॉलिवूडचे अनेक कलाकार देखील अयोध्येसाठी रवाना झाले आहेत. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्यासह आलिया-कतरिना देखील अयोध्येला रवाना झाले आहेत. साऊथ स्टार चिरंजिवी आणि रामचरण देखील आज अयोध्येला रवाना झाले आहेत.
अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाचा अभिषेक सोहळा काही तासांत सुरू होणार आहे. या ऐतिहासिक सोहळ्याचा भाग होण्यासाठी अनुपम खेर, रजनीकांत, कंगना रनौत यांच्यासह अनेक सेलिब्रिटी अयोध्येत आधीच पोहोचले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी १०.२० मिनिटांनी अयोध्येला पोहोचणार आहेत. तर, आता सकाळी अमिताभ बच्चन, आलिया-रणबीर, कतरिना-विकी कौशल हे अयोध्येला रवाना झाले आहेत. यावेळी त्यांनी आपल्या मनातील भावना देखील व्यक्त केल्या आहेत.
अभिनेता अनुपम खेर यांनी एएनआयशी बोलताना म्हटले की, ‘प्रभू रामाकडे जाण्यापूर्वी हनुमानाचे दर्शन घेणे खूप महत्त्वाचे आहे... अयोध्येचे वातावरण अतिशय सुंदर आहे. हवेतही जय श्री रामाचा जयघोष आहेत... पुन्हा दिवाळी आली आहे, हीच खरी दिवाळी आहे.’ तर, कतरिना कैफ आणि विकी कौशल हे देखील अयोध्येला रवाना झाले आहेत. यावेळी कतरिनाने प्राण प्रतिष्ठा सोहळ्यासाठी सोनेरी रंगाची साडी नेसली आहे. तर, विकी कौशलने बेज रंगाची शेरवानी परिधान केला होता.
अयोध्या राम मंदिराच्या अभिषेक सोहळ्यासाठी अभिनेता चिरंजीवी हैदराबादहून अयोध्येला रवाना झाला आहे. पापाराझींशी बोलताना ते म्हणाले की, ‘हे खरोखरच खूप सुंदर आहे. जबरदस्त आहे. ही एक दुर्मिळ संधी आहे. मला वाटते की, माझे दैवत भगवान हनुमान यांनी मला वैयक्तिकरित्या आमंत्रित केले आहे.’ अमिताभ बच्चन यांच्यासोबत आलिया भट्ट, रणबीर कपूर आणि रोहित शेट्टीही अयोध्येला रवाना झाले आहेत. दाक्षिणात्य अभिनेता पवन कल्याणने राम मंदिराच्या उभारणीसाठी ३० कोटी रुपयांची देणगी दिली आहे.
अभिनेत्री कंगना रनौत देखील अयोध्येत पोहोचली आहे. इंस्टाग्रामवर धीरेंद्र शास्त्रींसोबतचा एक फोटो पोस्ट करत तिने लिहिले की, 'मी पहिल्यांदाच माझ्यापेक्षा लहान असलेल्या गुरुजींना भेटले, ते माझ्यापेक्षा १० वर्षांनी लहान आहेत. लहान भावाप्रमाणे त्यांना मिठी मारावीशी वाटली. गुरुजींच्या चरणांना स्पर्श करून आशीर्वाद घेतले. जय बजरंगबली.'
संबंधित बातम्या