Happy Birthday Ashwini Kalsekar: मनोरंजन विश्वात असे काही चेहरे आहेत, ज्यांनी केवळ मराठी मनोरंजन विश्वच नाही तर, आपल्या दमदार अभिनयाने बॉलिवूड विश्व देखील दणाणून सोडलं. अशाच कलाकारांमध्ये एक नाव आवर्जून घ्यावं लागतं ते म्हणजे अभिनेत्री अश्विनी काळसेकर. आपल्या सहज सुंदर अभिनयाने आणि लूक्सनी तिने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं आहे. बहुतांश खलनायिकी भूमिका साकारणारी ही अभिनेत्री बॉलिवूडची ‘स्टायलिश व्हिलन’ म्हणूनही ओळखली जाते. तिचा मनोरंजन विश्वातील हा प्रवास देखील अगदी फिल्मी होता. आज (२२ जानेवारी) अभिनेत्री अश्विनी काळसेकर हिच्या वाढदिवसानिमित्ताने जाणून घेऊया तिच्या याचा फिल्मी कारकिर्दीबद्दल...
अश्विनी काळसेकर हिचा जन्म मुंबईतील एका सध्या मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अश्विनीने एअर होस्टेस बनण्याचं प्रशिक्षण घेतलं आणि ती हवाई सुंदरी बनली. निकारी करत असताना आपण कधी अभिनयाच्या क्षेत्रात पाऊल ठेवू असा विचार देखील तिने केला नव्हता. तिचं मनोरंजन विश्वात पदार्पण हा केवळ एक योगायोग होता. एका मैत्रिणीबरोबर तिच्या ऑडिशनसाठी गेली असताना, निर्मात्यांची नजर अश्विनीवर पडली. यावेळी तिची ऑडिशन घेतल्यानंतर अश्विनीची निवड एका प्रसिद्ध मालिकेसाठी झाली. पहिल्याच मालिकेतून अश्विनी टीव्ही जगतात चांगलीच चर्चेत आली होती.
एका मुलाखतीत स्वतः अश्विनी काळसेकर हिने हा किस्सा सांगितला होता. एअर होस्टेस म्हणून काम करत असताना अश्विनीला शुक्रवारी सुट्टी असायची. अशाच एका सुट्टीच्या दिवशी एक मैत्रीण अश्विनीला ऑडिशनला घेऊन गेली. त्यावेळी कबीर भाटीया यांनी अचानक अश्विनीची ऑडिशन घेतली आणि ‘शांती’ या मालिकेतील भूमिकेसाठी तिची निवडही केली. मात्र, ‘शांती’ ही मालिका टीव्हीवर येईपर्यंत अश्विनीने नोकरी सोडली नव्हती. ‘शांती’ या मालिकेचे शूटिंगही सुट्टीच्या दिवशी म्हणजे शुक्रवारीच करायची. पण या मालिकेतून प्रसिद्धी मिळाल्यानंतर अश्विनीने आनंदाने नोकरी सोडली. अश्विनी केवळ मालिकाच नव्हे, तर अनेक हिंदी, मराठी आणि साऊथ चित्रपटांमध्ये देखील झळकली आहे.
कौतुकाची गोष्ट म्हणजे अश्विनीने अभिनयाचे कोणतेही प्रशिक्षण घेतले नाही. दमदार अभिनयासाठी अश्विनीचे नेहमीच कौतुक केले गेले आहे. अश्विनी काळसेकर तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत होती. तिचे पहिले लग्न टीव्ही अभिनेता नीतेश पांडेसोबत झाले होते. पण, काही वादांमुळे अवघ्या चार वर्षांतच त्यांचा संसार मोडला. त्यानंतर २००९मध्ये अश्विनीने अभिनेता मुरली शर्मासोबत दुसरा विवाह केला.