प्रकाश आंबेडकरांनी (Prakash Ambedkar) शिरुरनंतर आता दिंडोरीतील उमेदवार बदलला आहे. वंचित बहुजन आघाडीकडून (Vanit Bahujan Aghadi) जाहीर करण्यात आलेल्या पाचव्या यादीत दिंडोरी लोकसभेसाठी गुलाब मोहन बर्डे यांना उमेदवारी जाहीर केली होती. मात्र बर्डे यांनी प्रकृतीच्या कारणास्तव लोकसभा निवडणूक लढण्यास नकार दिल्यानंतर वंचितने दिंडोरीत नवीन उमेदवार दिला आहे. दिंडोरीत आता वंचितकडून मालती शंकर थविल (Malati Shankar Thavil) यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
राज्यात महाविकास आघाडी व महायुतीत जागावाटपावरून खेळखंडोबा सुरूच असताना वंचितने राज्यात ३५ उमेदवार जाहीर करून आघाडी घेतली होती. मात्र त्यांच्याकडून उमेदवार बदलाबदलीचा गोंधळ सुरूच आहे. काही दिवसांपूर्वी वंचित बहुजन आघाडीने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पाचवी यादी जाहीर केली होती. या यादीत दिंडोरी लोकसभा मतदारसंघातही (Dindori Lok Sabha Constituency) उमेदवार देण्यात आला. मात्र आज अचानकपणे दिंडोरीचा उमेदवार बदलला आहे.
दिंडोरीच्या जागेवर माकपचे माजी आमदार जे पी गावित यांनी दावा ठोकला असून त्यांनी शरद पवार (Sharad Pawar) गटाचे उमेदवार भास्कर भगरे यांना पडण्याचा इशारा दिला आहे. यामुळे दिंडोरीचे राजकारण तापलं असून संपूर्ण राज्यात दिंडोरी लोकसभा मतदारसंघ चर्चेत आला आहे. दिंडोरीचे राजकारण तापलेले असतानाच आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दिंडोरीचा उमेदवार बदलला आहे.
दिंडोरीत आता तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. लोकसभा मतदारसंघात भाजपकडून केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार, शरद पवार गटाकडून भास्कर भगरे आणि वंचित बहुजन आघाडीकडून मालती थविल निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे दिंडोरीत कोण बाजी मारणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
लोकसभा निवडणुकीचा दुसरा टप्प्यातील मतदान २६ एप्रिल रोजी होणार आहे. मात्र, यापूर्वीच निवडणूक आयोगाकडून (Election Commission Of India) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena UBT) पक्षाला नोटीस पाठवल्याची माहिती समोर आली. ज्यात ठाकरे गटाच्या प्रचार गीतातून जय भवानी आणि हिंदू धर्माचा उल्लेख करणारा शब्द काढून टाकण्याचे आदेश दिले. यावर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
आम्ही देखील रामभक्त आहोत, हनुमान भक्त आहोत. आई तुळजा भवानी राज्याचे दैवत आहे. जय भवानी जय शिवाजी ही आपण घोषणा करतो. हा महाराष्ट्राचा अपमान आहे. कुलदैवतेबद्दल एवढा आकस आहे. ही हुकूमशाही आहे, असे म्हणत कोणत्याही परिस्थितीत शब्द काढणार नसल्याचे सांगितले.