MimUnconditional Support Shahu Maharaj: राज्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील निवडणुकांचा प्रचार शिगेला पोहोचला आहे.सर्वपक्षीय उमेदवारांकडून जोरदार शक्तीप्रदर्शनाने प्रचार केला जात असून विजयाचे दावे केले जात आहेत. यासाठी विविध पक्ष व संघटनांचा पाठिंबा मिळवण्याचे प्रयत्न केले जात आहे. राज्यात लोकसभा निवडणुकीत कोल्हापूर मतदारसंघाची (Kolhapur loksabha seat)विशेष चर्चा होत आहे. कारण कोल्हापूर मतदारसंघातून राजघराण्यातील छत्रपती शाहू महाराज (Chhatrapati Shahu Maharaj) निवडणुकीच्या मैदानात आहेत. त्यांच्या विरोधात विद्यमान खासदार संजय मंडलिक शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत.
महायुतीतील नेत्यांनी संजय मंडलिक यांच्या बाजुने आपली ताकद लावली आहे तर वंचितने शाहू महाराजांना पाठिंबा दिला आहे. मात्र आता शाहू महाराजांची ताकद चांगलीच वाढली आहे. कारण कोल्हापूरच्या जागेसाठी एमआयएमने काँग्रेस उमेदवार शाहू महाराजांना पाठिंबा दिला आहे.
एमआयएमचे नेते व छत्रपती संभाजीनगरचे खासदार इम्तियाज जलील यांनी पत्रकार परिषद घेत कोल्हापूर मतदारसंघासाठीची आपली भूमिका स्पष्ट केली. कोल्हापुरात छत्रपती शाहू महाराज यांना पाठिंबा देत असल्याचे त्यांनी जाहीर केले.
मुस्लीम समाज एमआयएमचा मोठा मतदार आहे. कोल्हापुरातही मुस्लिमांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे एमआयएमने आपला उमेदवार न देता शाहू महाराजांना पाठिंबा दिल्याने त्यांची ताकद वाढणार आहे.
दरम्यान काही दिवसांपूर्वी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनीही छत्रपती शाहू महाराजंना बिनशर्त पाठिंबा दिला आहे. यामुळे दलित तसेच बहुजन समाजाचा पाठिंबा शाहू महाराजांना मिळण्याची शक्यता आहे. शाहू महाराज यांच्या विजयासाठी महाविकास आघाडीतील नेते या मतदारसंघात एकदिलाने प्रचार करत आहेत.
वंचितने सांगली व हातकणंगलेत आपला उमेदवार दिला आहे, मात्र कोल्हापुरात महाराजांना पाठिंबा दिला आहे. वंचितचा महाविकास आघाडीतील समावेश जागावाटपाची चर्चा फिसकटल्याने झाला नाही. त्यानंतर वंचितने राज्यातील ३५ जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत.