Lok Sabha Election 2024 : देशात सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून पहिल्या टप्प्यातील मतदान काल (शुक्रवार) पार पडले. उत्तरप्रदेश राज्यातील मुरादाबाद मतदारसंघातही पहिल्या टप्प्यात मतदान पार पडले. मात्र येथी भाजप उमेदवार सर्वेश सिंह (Sarvesh singh passed away ) यांचे अचानक निधन झाले आहे. सर्वेश सिंह काल स्वत: मतदान करण्यास गेले होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती बरी नव्हती. त्यांच्या दातांवर काही उपचार सुरू होते. त्याचा त्रास वाढल्यानंतर त्यांना दिल्लीतील एम्समध्ये दाखल करण्यात आले.
सांगितले जात आहे की, एम्समध्ये सर्वेश सिंह यांना हृदयविकाराचा झटका आला व त्यातच त्यांचे निधन झाले. सर्वेश सिंह पश्चिमी यूपीमधील एकमेव ठाकुर उमेदवार होते. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने भाजपमध्ये दु:खाची लाट आली आहे.
सर्वेश सिंह १९९१ मध्ये भाजपच्या तिकीटावर ठाकुरद्वारा विधानसभा जागेवर निवडणूक लढली होती. त्यानंतर सलग चार वेळी त्यांनी निवडणूक जिंकली. ठाकुरद्वारा जागेवर पक्षाला अजून त्यांचा पर्याय मिळाला नाही. सर्वेश सिंह यांना भाजपाने चौथ्यांदा मुरादाबाद लोकसभा मतदारसंघातून तिकीट दिले होते. २००९ मध्ये त्यांना माजी क्रिकेटपटू मोहम्मद अजहरुद्दीन यांच्याकडून जवळपास ५० हजार मतांनी पराभव पत्करावा लागला होता. मात्र २०१४ मध्ये सपाचे उमेदवार के एसटी हसन यांना पराभूत करून मुरादाबाद मतदारसंघात त्यांच्या रुपात भाजपला पहिल्यांदाच विजय मिळाला होता.
त्यानंतरभाजपाने पुन्हा सर्वेश यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना तिसऱ्यांदा तिकीट दिली. सर्वेश सिंह यांचे वडील राजा रामपाल सिंहही ठाकुरद्वारा जागेवरून ४ वेळा आमदार झाले होते आणि अमरोहा जागेवरून खासदार झाले होते. सर्वेश सिंह यांचा मुलगा सुशांत सिंह बिजनौरच्या बढ़ापूर मतदारसंघात विद्यमान आमदार आहे.
नियमानुसार मतदानापूर्वी जर एखाद्या राजकीय पक्षाच्या उमेदवाराचे निधन झाले तर निवडणूक प्रक्रिया रद्द केली जाते. मात्र येथे मतदान पार पडले आहे. त्यामुळे मतमोजणीवर कोणताही परिणाम होणार नाही. मतमोजणीनंतर जर सर्वेश सिंह विजयी झाले तर ही जागा रिक्त घोषित केली जाईल व येथे पुन्हा पोटनिवडणूक घेतली जाईल. सर्वेश सिंह यांच्या विरुद्ध समाजवादी पक्षाचे रुची वीरा मैदानात आहेत. रुची वीरा यांची थेट लढत सर्वेश सिंह यांच्याशी होती.