पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, शनिवारी महाराष्ट्रात नांदेड आणि परभणी या दोन ठिकाणी निवडणूक प्रचार सभांना संबोधित केलं. ‘मोदी सरकार घरात घुसून सर्जिकल स्ट्राईक करते’ असं पंतप्रधान नरेंद्र मोदी परभणीच्या प्रचार सभेत उपस्थितांसमोर बोलले. कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नरेंद्र मोदी यांच्या या वक्तव्यावर टीका केली आहे. पटोले म्हणाले, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनला घाबरतात. म्हणूनच चीनने भारताच्या सीमेत घुसखोरी करुन आपली जमीन बळकावली आहे. आपले २० सैनिक मारले तरीही नरेंद्र मोदींना आजपर्यंत ते कसे दिसले नाही’, असा प्रश्न पटोले यांनी विचारला आहे.
पटोले म्हणाले, ‘नरेंद्र मोदींनी आज पुन्हा एकदा देशाच्या फाळणीचा मुद्दा उपस्थित करुन जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. देशाच्या फाळणीला काँग्रेस जबाबदार असल्याचा मोदींचा आरोप धांदात खोटा आहे. आरएसएसच्या खोटे बोलण्याच्या तालमीत तयार झालेल्या नरेंद्र मोदींकडून वेगळी अपेक्षा करणे चुकीचेच आहे. परंतु पंतप्रधान पदावरील व्यक्तीने बोलताना अभ्यास करुन बोलावे अशी अपेक्षा असते.’ असं पटोले म्हणाले. स्वातंत्र्य चळवळीत भाजपा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काहीही योगदान नाही. नरेंद्र मोदी ज्या विचारधारेचे प्रतिनिधित्व करतात तेच लोक मुस्लीम लीगबरोबर सरकारमध्ये सहभागी होते आणि त्याच परिवारातील संघटनेने द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत मांडला होता, हे पंतप्रधान नरेंद्र मोदींना माहित असायला हवे. पंतप्रधान मोदी चुकीची माहिती देऊन जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत, असं पटोले म्हणाले.
मराठवाड्यात सोयाबीन, बाजरी, ज्वारी तसेच कापसाला भाजप सरकारच्या काळात भावच मिळाला नाही. शेतकऱ्यांना आपला माल कवडीमोल भावाने विकावा लागला. मराठवाड्याचा शेतकरी संकटात असताना भाजपा मात्र शेतकऱ्यांना मदत देण्याऐवजी पक्ष फोडण्यात व्यस्त होता आणि आता निवडणुका आल्या की मोदींना शेतकऱ्यांची आठवण झाली. उज्वला गॅस, हर घर नल योजना, पंतप्रधान आवास योजना, मोफत राशन या योजनांचा पाढा मोदींनी वाचला. परंतु ५ किलो मोफत धान्य देऊन गरिबांना महागाईच्या खाईत लोटले, उज्वला गॅसच्या नावाखाली गरिबांचे रॉकेल बंद केले, ११०० रुपयांचा गॅसही घेता येत नाही अशा योजनांचा उपयोग काय, असं पटोले म्हणाले. आपण गरिबी पाहिली असल्याने गरिबांसाठी काम करत असल्याचे मोदींनी सांगितले. पण मोदींच्या १० वर्षाच्या काळातच देशातील गरिब अधिक गरिब झाला आहे. गरिबाला जगणे कठीण झाले आहे, असा आरोप पटोले यांनी केला.