लोकसभा निवडणुकीची तारीख जस-जशी जवळ येत आहे, राजकीय हालचाली गतिमान होत आहेत. वंचित बहुजन अघाडीचे (VBA)प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेना ठाकरे गटासोबत युती तोडत महाविकास आघाडीकडून आलेला ४ जागांचा प्रस्ताव फेटाळून लावला आहे. त्याचबरोबर त्यांनी जागावाटपाबाबत२६मार्चपर्यंतचा अल्टीमेटम दिला आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी वंचितने महाविकास आघाडीसोबत हात मिळवण्याचा विचार केला होता. मात्र जागावाटपावर घोडे अडले असून अजूनपर्यंत अंतिम निर्णय झालेला नाही.
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, महाविकास आघाडीने दिलेल्या ४जागांचा प्रस्ताव मी त्यांना परत करतो. मात्र अधिकृतपणे प्रत्यक्षात ते वंचितला तीनच जागा सोडत आहेत. आमची भूमिका आम्ही २६ मार्चला जाहीर करू. त्याचबरोबर त्यांनी अकोला मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले.
प्रकाश आंबेडकर म्हणाले काँग्रेस व शिवसेना गोंधळ घालत आहे. तसे आम्ही करत नाही. ज्या जागेवर मतभेत आहेत, त्याचा तिढा आधी सोडवा, लहान पक्षांना सामील करू घ्या, असे सुरुवातीपासून आम्ही सांगत आहे. मात्र यावर विचार होत नाही, दुसरीकडे वंचित आम्हाला प्रतिसाद देत नसल्याचे म्हटले जाते.
त्यामुळे २६तारखेपर्यंत आम्ही महाविकास आघाडीच्या प्रस्तावाची वाट पाहू. त्यानंतर पुढील दिशा ठरवली जाईल. आमची जी काही भूमिका असेल ती सर्वांसमोर जाहीर केली जाईल. असा अल्टिमेटम वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी अकोला मतदार संघातून प्रकाश आंबेडकर मैदानात उतरणार आहेत. येत्या २७ तारखेला ते अकोला मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.