NCP SP Lok Sabha Candidate List : महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा फॉर्मुला ठरल्यानंतर दुसऱ्याच दिवशी शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसनं तिसरी उमेदवार यादी जाहीर केली आहे. सातारा आणि रावेर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा केली आहे. त्यानुसार साताऱ्यातून शशिकांत शिंदे आणि रावेरमधून श्रीराम पाटील हे निवडणूक लढणार आहेत.
महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला १० जागा आल्या आहेत. त्यापैकी सात उमेदवारांची नावं आधीच जाहीर करण्यात आली आहेत. सातारा, रावेर आणि माढा या तीन मतदारसंघातील उमेदवार गुलदस्त्यात होते. त्यापैकी सातारा आणि रावेरचं चित्र आता स्पष्ट झालं आहे. आता केवळ माढा लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार जाहीर होणं बाकी आहे.
सातारा लोकसभा मतदारसंघ हा शरद पवार यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मतदारसंघ आहे. गेली अनेक वर्षे साताऱ्यानं काँग्रेसी विचारांना साथ दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर हा मतदारसंघ कायम पवारांनी स्वत:कडं राखला आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीच्या तिकिटावर इथून बाजी मारली होती. मात्र, त्यानंतर त्यांनी अचानक भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत सातारकरांनी उदयनराजे यांची सोथ सोडली आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या श्रीनिवास पाटील यांना निवडून दिलं. आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर हा मतदारसंघ ताब्यात घेण्यासाठी शरद पवार व अजित पवार यांच्यात चुरस आहे.
महायुतीमध्ये हा मतदारसंघ कोणाला मिळणार हे अद्याप ठरलेलं नाही. मात्र, उदयनराजे भोसले यांनी इथून निवडणुकीची तयारी केली आहे. भाजपच्या चिन्हावर लढण्याची त्यांची भूमिका आहे. त्यामुळं इथं तिढा निर्माण झाला आहे. असं असलं तरी त्यांनी प्रचार सुरू केल्यानंतर उमेदवारीची माळ त्यांच्याच गळ्यात पडेल अशी शक्यता आहे. त्यामुळं इथं शशिकांत शिंदे विरुद्ध उदयनराजे भोसले असा सामना होण्याची शक्यता आहे.
रावेरमध्ये महायुतीकडून रक्षा खडसे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. इथं एकनाथ खडसे यांना तिकीट देण्याचा शरद पवारांचा विचार होता. मात्र, खडसे यांनी प्रकृतीच्या कारणास्तव लढण्यास नकार दिला. त्यानंतर तर त्यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. अद्याप अधिकृत घोषणा झाली नसली तरी त्यांचा भाजप प्रवेश निश्चित मानला जात आहे. त्यामुळं शरद पवार यांनी तिथं श्रीराम पाटील यांना उमेदवारी दिली आहे. आता रक्षा खडसे आणि श्रीराम पाटील असा सामना तिथं होणार आहे.
संबंधित बातम्या