Vijay Wadettiwar on Raj Thackeray : राज ठाकरे यांनी काल गुढीपडावा मेळाव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांना लोकसभा निवडणुकीत पाठिंबा देणार असल्याचे घोषित केले. त्यांच्या या भूमिकेनंतर विरोधकांनी त्यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी राज ठाकरे यांच्यावर बोचरी टीका केली आहे. वडेट्टीवार म्हणाले, वाघाची शेळी झाली. इतक्या लवकर वाघ गवत खायला लागेल असे वाटले नव्हते. जेव्हा ते दिल्ली दरबारी गेले, तेव्हाच ते भाजप बरोबर जाणार हे राज्यातील जनतेला कळले होते, असेही वडेट्टीवार म्हणाले.
मनसेचा गुढीपाडवा मेळावा मंगळवारी शिवाजी पार्क येथे पार पडला. या मेळाव्यात बोलताना राज ठाकरेंनी अनेक खुलासे केले. दिल्लीत अमित शहांच्या भेटीनंतर मनसे महायुतीत सामील होत असल्याची चर्चा सुरू होती. त्यावर मंगळवारी शिक्कामोर्तब झाले. गुढीपाडवा मेळाव्यात नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी आपणा महायुतीला बिनशर्त पाठिंबा देत असल्याची घोषणा राज ठाकरेंनी मंगळवारी केली. त्यांच्या या भूमिकेनंतर विरोधकांनी त्यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली आहे.
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार राज ठाकरे यांच्यावर टीका करतांना म्हणाले, राज ठाकरे जेव्हा दिल्ली दरबारी गेले त्याचवेळी ते भाजप बरोबर जाणार हे मराठी जनतेला कळले होते. मात्र, वाघ इतक्या लवकर गवत खायला सुरुवात करेल असे वाटले नव्हते. वाघाची शेळी झाली असून शेळी नुसते गवत खाईल असे राज ठाकरे यांचे भाजप मध्ये जाऊन होऊ नये, असे देखील वडेट्टीवार म्हणाले.
वडेट्टीवार म्हणाले, राज ठाकरे या लढवय्या नेत्याने गुलामगिरीचे जोखड गळ्यात घातले का? राज ठाकरे महायुतीत गेल्याने महाविकास आघाडीच्या मतांवर परिणाम होणार नाही. २०१९ त्यांनी मोदी यांच्या विरोधात भूमिका घेतली, मात्र आता त्यांना पाठिंबा दिला. कदाचित अमित शहा यांनी त्यांची एखादी नस दाबली असेल. कूच तो दाल मैं काला है. आधी थोडेसे झुकले होते. आता ते कमरेतून झुकले. हे महाराष्ट्रातील जनतेला मान्य होणार नाही.