PM Modi in Ramtek today : चंद्रपूर येथील सभेनंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा नागपूर येथील रामटेक येथे होत आहे. मात्र, या सभेवर पावसाचे सावट आहे. मंगळवारी रामटेक येथे सभास्थळी जोरदार पाऊस झाला. वादळी वाऱ्यासह हा पाऊस झाल्याने संपूर्ण सभा मंडप पाण्यात गेले आहे. येथील पाणी काढण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सभास्थळी पोहचले असून त्यांनी येथील पाहणी केली आहे. दरम्यान, आज देखील हवामान विभागाने पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे या सभेवर पावसाचे सावट आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकसभा प्रचाराची राज्यातील पहिली सभा ही ८ एप्रिलला चंद्रपूर येथे झाली. या सभेत मोदी यांनी काँग्रेस व शिवसेना ठाकरे गटावर जोरदार हल्ला केला होता. त्यानंतर आज पंतप्रधान मोदी हे पुन्हा राज्यात येत आहेत. त्यांची दुसरी सभा ही नागपूर जिल्ह्यातील रामटेक लोकसभा मतदारसंघातील कन्हान येथे होत असून ते येथे आज संबोधित करणार आहेत.
मात्र, ही सभा होण्यापूर्वी मंगळवारी रात्री या परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने झोडपले. हवामान विभागाने या परिसरात वादळी वारे, मेघगर्जनेसह पावसाचा इशारा दिला होता. त्यानुसार काल या ठिकाणी जोरदार पाऊस झाला. रात्रीच्या सुमारास आलेल्या पावसामुळे कन्हांनला चांगलेच झोडपले. काही तास सुरू असलेल्या पावसामुळे सभास्थळी मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. मोदी यांच्या सभेसाठी या ठिकाणी मोठा मंडप उभारण्यात आला आहे. या मंडपात पाणी साचले होते. हे पाणी काढण्याचे काम सध्या सुरू आहे. या कामाची पाहणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.
हवामान विभागाने पुढचे काही दिवस विदर्भात अवकाली पावसाचा इशारा दिला आहे. नागपूरसह विदर्भातील काही जिल्ह्यात पावसाचा यलो आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे आज देखील मोदी यांच्या सभेवर पावसाचे सावट राहणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज कन्हान येथे हेलिकॉप्टरने येणार आहेत. त्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच सुरक्षा व्यवस्था देखील चोख ठेवण्यात आली आहे. पोलिसांनी वाहतूक व्यवस्थेत बदल केले आहेत. यानुसार बुधवारी दुपारी २ ते ९ या वेळेत मानकापूरकडून कामठीकडे जाणारी अवजड वाहने नवीन काटोल नाका चौक, कोराडीकडे वळविण्यात येणार आहेत. आशा हॉस्पिटल, कामठीकडे जाणारी वाहने खापरखेडा मागनि जातील. कळमनाकडून येणारी वाहने कळमना टी-पॉइंट येथे थांबवून आशा हॉस्पिटल मार्गे खापरखेडाकडे रवाना करण्यात येतील. इंदोराहून ऑटोमोटिव्ह चौकाकडे जाणारी वाहने ऑटोमोटिव्ह चौकातून डावे वळण घेऊन मानकापूर चौकाच्या दिशेने जातील.
ग्रामीण पोलिसांनी जारी केलेल्या सूचनांनुसार सभास्थळी पाण्याच्या बॉटल, डबा, बॅग नेण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच काळे कपडे घालून येण्यासदेखील मनाई करण्यात आली आहे. काळ्या कपड्यात कुणी आढळला तर त्याला सभास्थळी प्रवेश नाकारण्यात येणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या प्रचार सभेत काँग्रेसला लक्ष्य करतात. रामटेक हा राखीव अनुसूचित जातीसाठी राखीव मतदारसंघ आहे. त्यामुळे मागासवर्गीयांसाठी केंद्र शासनाने राबवलेल्या योजनांची माहिती मोदी देतील व याच मुद्यावर काँग्रेसला धारेवर धरतील. रामटेकचे धार्मिक महत्व असून अयोध्येतील राम मंदिर उभारणीचे श्रेय भाजप घेत असून या मुद्यावरही मोदी भाष्य करतील, असे बोलले जात आहे.