मराठी बातम्या  /  निवडणुका  /  sambhaji nagar news : लोकसभेचा उमेदवार ठरवण्यासाठी झालेल्या मराठा समाजाच्या बैठकीत जोरदार हाणामारी

sambhaji nagar news : लोकसभेचा उमेदवार ठरवण्यासाठी झालेल्या मराठा समाजाच्या बैठकीत जोरदार हाणामारी

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Mar 29, 2024 04:05 PM IST

Marathi Karyakarta clashes in Sambhaji Nagar : छत्रपती संभाजी नगर लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार ठरवण्यासाठी आयोजित मराठा समाजाच्या बैठकीत आज जोरदार राडा झाला.

लोकसभेचा उमेदवार ठरवण्यासाठी झालेल्या बैठकीत मराठा तरुणांमध्ये हाणामारी
लोकसभेचा उमेदवार ठरवण्यासाठी झालेल्या बैठकीत मराठा तरुणांमध्ये हाणामारी

Marathi Karyakarta clashes in Sambhaji Nagar : मराठा आरक्षण आंदोलनात निर्णायक यश न मिळाल्यामुळं राजकारण्यावर संतापलेल्या मराठा आंदोलकांनी आता लोकसभा निवडणुकीत उमेदवार उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. याच अनुषंगानं छत्रपती संभाजीनगरमध्ये आज झालेल्या बैठकीत आज आपसातच राडा झाला. बैठकीला आलेले काही मराठा तरुण एकमेकांच्या अंगावर धावून गेले व एकमेकांना मारहाणही केली.

ट्रेंडिंग न्यूज

आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यातील ठराविक मतदारसंघात मराठा समाजाच्या वतीनं उमेदवार देण्याचं ठरवण्यात आलं आहे. त्यानुसार मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी छत्रपती संभाजीनगर लोकसभेसाठी उमेदवार ठरवण्यासाठी बैठक घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार मराठा मंदिरात आज बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र, या बैठकीत काही कारणावरून बाचाबाची आणि नंतर हाणामारी झाली.

उमेदवार ठरवण्यासाठी बैठक घेताना आम्हाला विश्वास घेतलं गेलं नाही. काही ठराविक लोकांना फोन केले गेले, असा आरोप काही तरुणांनी केला. बैठकीत उमेदवार म्हणून एकाच व्यक्तीचं नाव घेतलं जात होतं. याचा अर्थ काही लोक ठरवून आले होते. या लोकांनी राजकीय लोकांकडून पैसे घेतले असावेत, असा आरोप एका तरुणानं टीव्ही ९ या वृत्तवाहिनीशी बोलताना केला.

बैठकीत एकमेकांची नावं घेऊन कोणीही बोलायचं नाही असं आधीच ठरलं होतं. सर्वसमावेशक व्यक्तीचं नाव ठरवण्यात येणार होतं. जास्त उमेदवारांची नावं पुढं आल्यास मनोज जरांगे सांगतील ते नाव फायनल केलं जाईल असंही ठरलं होतं. मात्र काही लोक विशिष्ट व्यक्तींची नावं वारंवार घेत होते व इतरांना बोलू दिलं जात नव्हतं. त्यातून हा गोंधळ झाला, असा आरोप एका कार्यकर्त्यानं केला.

काही समंजस कार्यकर्त्यांनी हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. सगळे समाजबांधवच इथं एकत्र आले होते. जे काही झालं ते व्हायला नको होतं, पण हा वाद मिटून जाईल, असंही एका कार्यकर्त्यानं सांगितलं. या प्रकारानंतर बैठक अर्ध्यातच आटोपण्यात आली. आता मनोज जरांगे पाटील या प्रकरणावर काय भूमिका घेतात याकडं लक्ष लागलं आहे.

मराठा आंदोलकांची उद्या बैठक

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे पाटील यांना लोकसभा निवडणुकीत सोबत येण्याची साद घातली आहे. त्या संदर्भात निर्णय घेण्यासाठी उद्या मराठा समाजाची बैठक होणार आहे. त्यात वंचितच्या सोबत जाऊन उमेदवार उभे करायचे की स्वतंत्र ताकद आजमवायची यावर निर्णय होणार असल्याचं समजतं.

WhatsApp channel