Eknath Shinde led shivsena Lok Sabha Candidate list : एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेनं लोकसभा निवडणुकीसाठी ८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली आहे. पक्षांतर्गत नाराजी टाळण्यासाठी विद्यमान खासदारांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. तर, मित्र पक्षांचा दावा असलेल्या जागांवरील उमेदवारांची नावं घोषित करणं टाळलं आहे.
शिंदे सेनेनं जाहीर केलेल्या ८ जागांपैकी ७ जागांवर विद्यमान खासदारांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. रामटेकचे विद्यमान खासदार कृपाल तुमाने यांचा पत्ता कट करण्यात आला आहे. तिथं काँग्रेसमधून आलेले आमदार राजू पारवे यांना संधी देण्यात आली आहे. पहिल्या यादीत कल्याण-डोंबिवली, ठाणे, वाशिम-यवतमाळ व नाशिक मतदारसंघातील उमेदवार जाहीर करण्यात आलेले नाहीत. या पाचही मतदारसंघावर महायुतीतील भाजप व अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं दावा केला आहे.
कल्याण-डोंबिवली मतदारसंघात सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे हे खासदार आहेत. ही जागा भाजपला मिळावी असा स्थानिक कार्यकर्त्यांचा आग्रह होता. मात्र, ते शक्य दिसत नसल्यामुळं ठाणे लोकसभा मतदारसंघावर भाजपनं दावा केला आहे. त्यामुळं या दोन्ही मतदारसंघातील उमेदवार घोषित करण्यात आलेले नाहीत.
वाशिम-यवतमाळ लोकसभा मतदारसंघात भावना गवळी या विद्यमान खासदार आहेत. भावना गवळी यांच्यावर खुद्द भाजपनंच भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असताना केंद्रीय यंत्रणांनी गवळी यांच्या कारखान्यांवर व मालमत्तांवर अनेकदा छापे टाकले होते. त्या शिंदे यांच्यासोबत गेल्यामुळं त्यांच्यावरील कारवाई थांबली होती. मात्र, त्यांना पुन्हा तिथून उमेदवारी देण्यास भाजपनं विरोध केला आहे. त्यामुळं तिथं संजय राठोड यांच्या नावाची चर्चा आहे. मात्र, संजय राठोड यांच्यावरही गंभीर आरोप आहेत. त्यामुळं तिथंही उमेदवार घोषित करणं सध्या शिंदे गटानं टाळल्याचं समजतं.
नाशिक लोकसभा मतदारसंघात सध्या शिंदे गटाचे हेमंत गोडसे हे खासदार आहेत. त्यांनी या जागेवर दावा केला आहे. श्रीकांत शिंदे यांनी एका सभेत गोडसे यांच्या नावाची घोषणाही केली होती. मात्र, भाजप व अजित पवार यांच्या पक्षानं जागेवर दावा केल्यामुळं तिथं तिडा निर्माण झाला आहे. त्यामुळं तिथं उमेदवारी घोषित करणंही टाळण्यात आल्याचं बोललं जातं.
मावळ - श्रीरंग बारणे
हिंगोली - हेमंत पाटील
दक्षिण मध्य मुंबई - राहुल शेवाळे
कोल्हापूर - संजय मंडलिक
रामटेक - राजू पारवे
हातकणंगले - धैर्यशील मोहिते पाटील
शिर्डी - सदाशिव लोखंडे
बुलढाणा - प्रतापराव जाधव
संबंधित बातम्या