Satara Lok Sabha Election 2024 : आगामी लोकसभा निवडणुकीची रणधुमाळीसुरू झाली असून जवळपास सर्वच पक्षांनी आपले उमेदवार जाहीर केले आहेत. महाराष्ट्रात महाविकास आघाडी व महायुतीचे उमेदवार जवळपास निश्चित झाले असून काही जागांवर वाद असल्याने ते कायम आहेत. भाजपने नाशिकची जागा सोडून सातारा मतदारसंघ पदरात पाडून घेतला असून येथे उदयनराजे भोसले यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. मात्र त्यांच्याविरोधात महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असणार? याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.
सातारा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातून विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांनी माघार घेतली आहे. प्रकृतीच्या कारणावरून त्यांनी लोकसभा निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला आहे, याची माहिती शरद पवार यांनी दिली आहे. शरद पवार सातारा दौऱ्यावर असून येत्या २-३ दिवसात साताऱ्याचा उमेदवार निश्चित केला जाईल असे पवार म्हणाले. श्रीनिवास पाटील यांनी निवडणूक लढण्यास नकार दिल्याने आता महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असणार?या प्रश्नावर शरद पवार म्हणाले की, चार नावे चर्चेत आहेत.शशिकांत शिंदे, बाळासाहेब पाटील, सुनील माने तसेच सत्यजित पाटील यांच्या नावांवर विचार सुरू आहे. येत्या दोन-ती दिवसात यावर विचार करून अंतिम निर्णय घेतला जाईल, असे पवार म्हणाले.
कार्यकर्त्यांशी संवाद साधताना शरद पवार म्हणाले, श्रीनिवास पाटील यांनी पुन्हा लोकसभा लढवावी अशी इच्छा होती. मात्र प्रकृतीचे कारण देत त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. माझ्याकडून मतदारांना न्याय देता येणार नाही. त्यामुळे मी निवडणूक लढवणार नाही,असं श्रीनिवास पाटील यांनी म्हटलं आहे.
शरद पवारांनी पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला. त्यावेळी सातारा लोकसभा मतदारसंघातून तुम्हीच निवडणूक लढवावी, असा आग्रह राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक नेते, पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांनी शरद पवारांकडे धरला होता. मात्र, राज्याची जबाबदारी असल्याने मला अधिक लक्ष द्यावं लागतं आहे. त्यामुळे मला तुमची इच्छा पूर्ण करता येणार नाही,असं शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना सांगितलं. त्यानंतर कार्यकर्त्यांनी साताऱ्यातील उमेदवारीबाबत शरद पवारांना काही नावे सुचवली आहे. त्यावर सविस्तर चर्चा करून एक ते दोन दिवसांत निर्णय घेतला जाईल, असंही शरद पवार यांनी स्पष्ट केलं.
संबंधित बातम्या