Amit Shah Assets : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुजरातमधील गांधीनगर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला आहे. अर्जासोबत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रातून शहा यांच्या संपत्तीचा आकडा समोर आला आहे. त्यानुसार अमित शहा व त्यांची पत्नी सोनल शहा यांच्या नावे मिळून सुमारे ६५.६७ कोटींची संपत्ती आहे.
अमित शहा यांच्या नावे १६.३१ कोटींची स्थावर मालमत्ता आहे. त्यात शेतजमीन, भूखंड व घरांचा समावेश आहे. तर, २०.२३ कोटींची जंगम मालमत्ता आहे. शहा यांची पत्नी सोनल शहा यांच्या नावे २२.४६ कोटींची मालमत्ता आहे. त्यात १.१० कोटींच्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांचा समावेश आहे.
अमित शहा यांच्या संपत्तीमध्ये शेअरमधील गुंतवणुकीचा वाटा मोठा आहे. शहा यांची १८० सूचीबद्ध कंपन्यांमध्ये तर त्यांच्या पत्नीची सुमारे ८० कंपन्यांमध्ये गुंतवणूक आहे. यात हिंदुस्तान युनिलिव्हर (१.४ कोटी), एमआरएफ (१.३ कोटी), कोलगेट-पामोलिव्ह (१.१ कोटी), प्रॉक्टर अँड गॅम्बल हायजीन हेल्थ केअर (०.९६ कोटी) आणि एबीबी इंडिया (०.७ कोटी) या कंपन्यांचा समावेश आहे. शेअरमधील एकूण गुंतवणुकीपैकी एक तृतीयांश गुंतवणूक वरील पाच कंपन्यांमध्ये असून त्या गुंतवणुकीचं मूल्य १७.४ कोटी रुपये आहे.
पाच वर्षांपूर्वीच्या आकडेवारीशी तुलना केल्यास अमित शहा यांच्या गुंतवणुकीत फारसा बदल झालेला नाही. उदाहरणार्थ, पाच वर्षांपूर्वी त्यांच्याकडं हिंदुस्थान युनिलिव्हरचे ५ हजार शेअर्स होते. त्यांचं गुंतवणूक मूल्य ८४ लाख रुपये होतं. आता त्यांच्याकडं १.४ कोटी रुपयांचे ६१७६ शेअर्स आहेत. मात्र, टॉप कंपन्यांच्या शेअर्सच्या संख्येत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
अमित शहा यांची पत्नी सोनल शहा यांची गुंतवणूक सन फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज, करूर वैश्य बँक, भारती एअरटेल, कॅनरा बँक, गुजरात फ्लोरोकेमिकल्स आणि लक्ष्मी मशीन वर्क्स या कंपन्यांमध्ये आहे. सूचीबद्ध कंपन्यांमध्ये त्यांची गुंतवणूक एकूण २० कोटी रुपये आहे.
केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपची सत्ता आल्यानंतर अमित शहा यांचा राजकीय आलेख सातत्यानं वाढत गेला. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या अमित शहा यांची पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. त्यांना राज्यसभा सदस्यत्वही देण्यात आलं. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत शहा यांनी गांधीनगर मतदारसंघातून ५ लाखांहून अधिक मतांनी विजय मिळवला. आता ते दुसऱ्यांदा रिंगणात आहेत. काँग्रेसनं त्यांच्या विरोधात पक्षाच्या सचिव सोनल पटेल यांना उमेदवारी दिली आहे. गुजरातमधील लोकसभेच्या सर्व २६ जागांसाठी तिसऱ्या टप्प्यात ७ मे रोजी मतदान होणार आहे.
संबंधित बातम्या