मराठी बातम्या  /  निवडणुका  /  Solapur loksabha : सोलापूर मतदारसंघात मोठा ट्विस्ट, वंचितच्या उमेदवाराची निवडणुकीतून माघार, दिलं धक्कादायक कारण

Solapur loksabha : सोलापूर मतदारसंघात मोठा ट्विस्ट, वंचितच्या उमेदवाराची निवडणुकीतून माघार, दिलं धक्कादायक कारण

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Apr 22, 2024 04:41 PM IST

Solapur Loksabha Seat : सोलापूर मतदारसंघात मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे. वंचितचे अधिकृत उमेदवार राहुल गायकवाड यांनी कार्यकारिणीची मदत होत नसल्याचा आरोप करत ऐनवेळी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली आहे.

सोलापूरमधून वंचितच्या उमेदवाराची ऐनवेळी माघार
सोलापूरमधून वंचितच्या उमेदवाराची ऐनवेळी माघार

देशभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला चार दिवसांचा अवधी शिल्लक असून तिसऱ्या टप्प्यात मतदान होणाऱ्या मतदारसंघात उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. अरज माघारीच्या शेवटच्या दिवशी सोलापूर मतदारसंघात (Solapur lok sabha constituency) मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे. सोलापूरच्या जागेवरून वंचित बहुजन आघाडीचे (vanchit Bahujan aghadi) उमेदवार राहुल गायकवाड (Rahul Gaikwad ) यांनी ऐनवेळी माघार घेतली आहे. राहुल गायकवाड वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार होते. त्यांच्या माघारीने सोलापुरातील समीकरण बदलणार आहे. वंचितची स्थानिक कार्यकारणी मदत करणार नाही तसेच माझ्या उमेदवारीने भाजप उमेदवाराचा फायदा होईल हे लक्षात आल्याने आपण निवडणुकीतून माघार घेत असल्याचे राहुल गायकवाड यांनी सांगितले.

ट्रेंडिंग न्यूज

राहुल गायकवाड यांनी उमेदवारी जाहीर केल्यानंतर म्हटले की, आंबेडकरी चळवळ माझ्या डीएनएमध्ये आहे. सोलापुरातून माझी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर १५ दिवसापासून मी सोलापूर मतदारसंघात फिरत आहे. मी सोलापूरमधील वंचितच्या कार्यकारिणीला भेटलो तसेच मतदारांनाही भेटलो. या १५ दिवसात मी खूप काही अनुभवले. या काळात मी जे अनुभवले ते चळवळीत अभिप्रेत नाही. सोलापुरातील भोळीभाबडी जनता आंबेडकर या एका नावासाठी भावनिक असून त्यांना प्रचंड आदर आहे. मात्र चळवळीसाठीची कार्यकर्त्यांची फळी पोषक नसून खूपच पोकळ आहे.

सोलापुरातील वंचितच्या कार्यकारिणीत स्वार्थ दिसत आहे. त्यामध्ये बाबासाहेबांचे स्वप्न दिसत नाही. मी सोलापूर मतदारसंघात लढण्यासाठी उतरलो होतो. पण नंतर माझ्या लक्षात आलं की, मला मैदानात लढण्यासाठी सोडलं असून माझ्या हातात बंदुक तर आहे मात्र त्या बंदुकीत गोळ्या नसून त्यात छर्रे आहे. याच्या मदतीने मी युद्ध तर लढेन मात्र जिंकू शकणार नाही, असं गायकवाड म्हणाले.

भाजपचा उमेदवार निवडून येऊ नये म्हणून निर्णय -

मी शेवटपर्यंत लढलो तर भाजपच्या उमेदवाराला मदत केल्यासारखं होईल. माझ्या अर्धवट युद्धाने भाजपच्या उमेदवाराला अनुकूल वातावारण निर्माण होण्याची भीती आहे. माझ्यामुळे भाजपचा एक नेता संसदेत जाईल व त्यामुळे संविधानाला धोका निर्माण होऊ शकतो. असे कृत्य माझ्याकडून होऊ नये, म्हणून मी निवडणुकीच्या रिंगणातून मागे हटण्याचा निर्मणय घेतला आहे, असं स्पष्टीकरण राहुल गायकवाड यांनी अर्ज माघारीनंतर दिलं आहे.

WhatsApp channel