मराठी बातम्या  /  निवडणुका  /  MNS BJP Alliance : मनसेशी युतीबाबत देवेंद्र फडणवीस यांचं मोठं विधान; म्हणाले, मला विश्वास आहे की…

MNS BJP Alliance : मनसेशी युतीबाबत देवेंद्र फडणवीस यांचं मोठं विधान; म्हणाले, मला विश्वास आहे की…

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Apr 08, 2024 02:53 PM IST

Devendra Fadnavis on MNS BJP Alliance : राज ठाकरे यांची मनसे भाजप आणि महायुती सोबत येणार का, या प्रश्नाचं उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी आज दिलं.

मनसेशी युतीबाबत देवेंद्र फडणवीस यांचं मोठं विधान; म्हणाले, मला विश्वास आहे की…
मनसेशी युतीबाबत देवेंद्र फडणवीस यांचं मोठं विधान; म्हणाले, मला विश्वास आहे की…

Devendra Fadnavis on MNS BJP Alliance : राज्यात जागावाटप आणि उमेदवारीवरून प्रमुख राजकीय पक्षात रस्सीखेच सुरू असताना युती, आघाडीतील घटक पक्ष वाढवण्याचा प्रयत्न सुरू आहे. राज ठाकरे यांची मनसे महायुतीत सहभागी होणार का हा सध्या उत्सुकतेचा विषय बनला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज यावर प्रथमच भाष्य केलं. राज ठाकरे हे नरेंद्र मोदी यांना साथ देतील, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.

ट्रेंडिंग न्यूज

शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडून, त्या पक्षातील मोठे गट सोबत घेतल्यानंतरही भाजपच्या समोरचं आव्हान कायम आहे. महाविकास आघाडीला राज्यात बऱ्यापैकी अनुकूल वातावरण असल्याचं चित्र आहे. त्यामुळंच भाजपनं मनसेला सोबत घेऊन ताकद वाढवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मधल्या काळात राज ठाकरे यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेटही घेतली होती. त्यानंतर मनसे महायुतीत सहभागी होणार असल्याची चर्चा सुरू झाली. तसंच, राज ठाकरे हे शिवसेनेच्या शिंदे गटाचे प्रमुख होणार अशाही चर्चा सुरू झाल्या.

या सगळ्या पार्श्वभूमीवर ९ एप्रिल रोजी होणाऱ्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. त्याच अनुषंगानं पत्रकारांनी फडणवीसांना प्रश्न विचारला. त्यावर फडणवीस यांनी थेट उत्तर देणं टाळलं. मात्र, राज ठाकरे हे भाजपसोबत, नरेंद्र मोदी यांच्या सोबत येतील, असा विश्वास व्यक्त केला.

'मनसेशी काही चर्चा गेल्या काळात झाल्या आहेत. मनसेनं हिंदुत्वाचा अजेंडा घेतल्यापासून त्यांच्याशी काही प्रमाणात जवळीक वाढली आहे. राज ठाकरे हे पहिले असे व्यक्ती आहेत, ज्यांनी २०१४ साली नरेंद्र मोदी यांना जाहीर पाठिंबा दर्शवला होता. मोदींना पंतप्रधान करण्याची भूमिका घेतली होती. मधल्या काळात त्यांनी वेगळी भूमिका घेतली होती. मात्र, गेल्या १० वर्षांत ज्या पद्धतीनं पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताचा मोठ्या प्रमाणात विकास झाला. नव्या भारताची निर्मिती केली. राज ठाकरे यांनाही त्याची जाणीव असेल. अशा परिस्थितीत सर्वांनीच मोदींच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे, असं फडणवीस म्हणाले.

'जे राष्ट्रीय विचारांनी प्रेरित आहेत, ज्यांच्यासाठी समाज आणि राष्ट्र प्रथम आहे. त्यांनी मोदींसोबत राहिलं पाहिजे, असं मला वाटतं. राज ठाकरे हे महायुतीसोबत, मोदींसोबत राहतील. त्यांनी मोदींना पाठिंबा द्यावा, अशी अपेक्षा फडणवीस यांनी व्यक्त केली.

WhatsApp channel