मराठी बातम्या  /  निवडणुका  /  Nitish Kumar viral video : एनडीएचे ४००० खासदार निवडून येतील…! नितीश कुमार यांचा व्हिडिओ व्हायरल; विरोधकांनी उडवली खिल्ली

Nitish Kumar viral video : एनडीएचे ४००० खासदार निवडून येतील…! नितीश कुमार यांचा व्हिडिओ व्हायरल; विरोधकांनी उडवली खिल्ली

Haaris Rahim Shaikh HT Marathi
Apr 08, 2024 01:35 PM IST

Nitish Kumar Viral video : बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी एका प्रचार सभेत केलेलं भाषण सध्या बिहारमध्ये चांगलंच चर्चेचा विषय बनलाय. या भाषणाच्या व्हिडिओ क्लिप्स व्हायरल होत आहेत.

Prime Minister Narendra Modi with Bihar Chief Minister Nitish Kumar during a public meeting ahead of Lok Sabha elections, in Nawada, Bihar,
Prime Minister Narendra Modi with Bihar Chief Minister Nitish Kumar during a public meeting ahead of Lok Sabha elections, in Nawada, Bihar, (HT photo)

देशात लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रंगत हळूहळू  वाढत चालली आहे. बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीशकुमार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नुकतीच संयुक्त प्रचार सभा झाली. या प्रचारसभेत नितीश कुमार यांनी केलेलं भाषण सध्या बिहारमध्ये चांगलंच चर्चेचा विषय बनलाय. या भाषणाच्या व्हिडिओ क्लिप्स व्हायरल होत आहेत. लोकसभा निवडणुकीत भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी (National Democratic Alliance) चार हजारांहून अधिक जागा जिंकेल, असं भाकीत नितीश कुमार यांनी या प्रचार सभेत बोलताना केला होता. 

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचं मतदान १९ एप्रिल होणार आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी जानेवारीत लालू प्रसाद यादव यांच्या आरजेडीशी काडीमोड घेत एनडीएत परतले होते. बिहारमध्ये जेडीयू आणि भाजपची युती असून बिहारच्या नवादा शहरात एनडीएची नुकतीच रॅली झाली. नितीश कुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर केलेल्या या घोषणेचा व्हिडिओ व्हायरल होतोय. या रॅलीमध्ये बोलताना मुख्यमंत्री नितीश कुमार सुरूवातीला 'चार लाख' म्हणाले… त्यानंतर चूक सुधारत ‘चार हजार से भी ज्यादा’ असं उच्चार त्यांनी केला. 

ट्रेंडिंग न्यूज

दरम्यान, नितीश कुमार यांच्या या वक्तव्यावर विरोधकांकडून खिल्ली उडवली जात आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या भाषणावर टिका करताना आरजेडीच्या नेत्याच्या भाषणाची एक व्हायरल क्लिप पुन्हा पोस्ट केली आहे. 'एनडीएला देशातील खासदारांच्या संख्येबद्दल माहिती नसल्याने भाजप नेत्यांच्या चेहऱ्यावर पराभव स्पष्ट दिसत आहे. आश्वासने दिल्यानंतर मागे हटणाऱ्या लोकांना कसे हाकलायचे हे नवादातील जनतेला ठावूक आहे. बिहारसाठी जाहीर झालेले विशेष पॅकेज कुठे आहे? बिहारला विशेष राज्याचा दर्जा कुठे आहे? असे प्रश्न राजदने पोस्ट केलेल्या व्हिडिओत विचारण्यात आले आहे.

नितीश कुमार हे बिहारचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री पदावर राहिलेले मुख्यमंत्री आहेत. भाषणाच्या वेळी त्यांची यापूर्वी अनेकदा जीभ घसरल्याने चर्चेत राहिले आहेत. त्यांनी स्वत:ला माजी केंद्रीय गृहमंत्री म्हणून संबोधल्याने त्यावेळी विरोधी पक्षात असलेल्या भाजपने नितीश कुमार यांची खिल्ली उडवली होती.
 

दरम्यान, नवादा येथील एनडीएच्या निवडणूक प्रचारसभेत बोलताना नितीशकुमार यांनी १९९० ते २००५ या काळात बिहारमध्ये राजदच्या राजवटीवरून टीका केली. ‘बिहारचा झपाट्याने विकास होत आहे. राज्यात रस्ते तयार करण्यात आले आहे. कुठलाही जातीय तणाव नाही. आम्ही लोकांना एकत्र केले. २००५ पूर्वी काय परिस्थिती होती, हे लोकांनी लक्षात ठेवले पाहिजे. रात्री उशिरा घराबाहेर पडायला लोक घाबरत असत.’ असं नितीश कुमार म्हणाले.

दरम्यान, बिहारमध्ये लोकसभेच्या एकूण ४० जागा असून २०१९ साली एनडीएचे ३९ खासदार निवडून आले होते. यात भाजपचे १७, जेडीयू १६ आणि लोकजनशक्ती पार्टीच्या सहा खासदारांचा समावेश होता.

WhatsApp channel

संबंधित बातम्या