मराठी बातम्या  /  निवडणुका  /  vishal patil : सांगलीच्या घराघरात काँग्रेस, निवडणूक आम्हीच लढवणार; विशाल पाटील यांनी वाढवलं महाविकास आघाडीचं टेन्शन

vishal patil : सांगलीच्या घराघरात काँग्रेस, निवडणूक आम्हीच लढवणार; विशाल पाटील यांनी वाढवलं महाविकास आघाडीचं टेन्शन

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Apr 08, 2024 01:34 PM IST

Vishal Patil on Sangli Lok Sabha Constituency : सांगली लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीवर काँग्रेस नेते विशाल पाटील ठाम आहेत. आजच्या पत्रकार परिषदेत त्यांनी पुन्हा एकदा याचा पुनरुच्चार केला.

सांगलीतील घराघरात काँग्रेस, निवडणूक आम्हीच लढवणार; विशाल पाटील यांनी वाढवलं टेन्शन
सांगलीतील घराघरात काँग्रेस, निवडणूक आम्हीच लढवणार; विशाल पाटील यांनी वाढवलं टेन्शन

Vishal Patil on Sangli Lok Sabha Seat : 'सांगलीच्या घराघरात काँग्रेस आहे. इथं निवडणूक लढण्यावर आम्ही ठाम आहोत. उद्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर निर्णय होईल. तो आमच्या बाजूनंच येईल,' असा ठाम विश्वास काँग्रेसचे सांगलीतील इच्छुक उमेदवार विशाल पाटील यांनी आज बोलून दाखवला. विशाल पाटील यांच्या या ठाम भूमिकेमुळं महाविकास आघाडीचं टेन्शन वाढलं आहे.

ट्रेंडिंग न्यूज

सांगली लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीवरून महाविकास आघाडीमध्ये मोठा तिढा निर्माण झाला आहे. सांगलीतून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिली आहे. मात्र, हा काँग्रेसचा परंपरागत मतदारसंघ असून इथून काँग्रेसच निवडणूक लढवेल असं स्थानिक नेत्यांचं म्हणणं आहे. त्यासाठी विशाल पाटील यांचं नाव एकमतानं काँग्रेस पक्षश्रेष्ठींना सुचवण्यात आलं आहे. असं असलं तरी ठाकरेंची शिवसेना ही जागा लढण्यावर ठाम आहे.

या पार्श्वभूमीवर विशाल पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडली. 'सांगलीत उमेदवारीचा कोणताही तिढा नव्हता. तो अनपेक्षितपणे निर्माण झाला. सांगली काँग्रेसनं एकमतानं माझं नाव उमेदवारीसाठी पाठवलं होतं. आम्ही ही जागा लढण्यावर आजही ठाम आहोत. विश्वजीत कदम हे त्यासाठी प्रयत्न करत आहेत. उद्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर वरिष्ठ निर्णय घेतील आणि हा निर्णय आमच्याच बाजूनं लागेल, असं विशाल पाटील म्हणाले.

संजय राऊत यांच्याबद्दल आदर

संजय राऊत हे पुरोगामी नेतृत्वाचा आवाज आहेत. त्यांच्याबद्दल आम्हाला प्रचंड आदर आहे. ते भाजपच्या विरोधात बोलतात, त्यामुळं आम्हालाही ऊर्जा मिळते. मात्र, आता त्यांचा आवाज सांगलीच्या विरोधात जातोय, अशी खंत विशाल पाटील यांनी व्यक्त केली. संजय राऊत यांनी विश्वजीत कदम यांच्याबद्दल प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे काही विधानं केली. विश्वजीत कदम हे सांगली लोकसभेच्या जागेसाठी बाजू मांडत होते. अशावेळी त्यांच्याबद्दल संशयास्पद वक्तव्यं करणं हे आघाडी धर्माला शोभणारं नाही,’ असंही विशाल पाटील म्हणाले.

सांगलीचा विषय बंद खोलीत व्हायला हवा होता!

'सांगलीच्या उमेदवारीचा विषय बंद खोलीत व्हायला हवा होता. तो बाहेर आला. त्यामुळं विश्वजीत कदम यांनी त्यावर मत मांडलं. ही जागा आमची आहे असं ते म्हणाले. वैयक्तिक पातळीवर आम्ही कधीच काही केलं नाही. मात्र रोजच्या रोज हा मुद्दा विनाकारण ताणला गेला, असं विशाल पाटील म्हणाले.

निर्णयाआधी राऊत साहेब सांगलीत का?

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सांगलीच्या उमेदवारीचा निर्णय होईल. मात्र हा निर्णय होण्याआधी राऊत साहेब तीन-तीन दिवस सांगलीत का येत आहेत? राज्यात लोकसभा निवडणूक सुरू आहे. राऊत साहेबांना देशभरातून भाषणांसाठी मागणी आहे. मग ते सांगलीत वेळ का वाया घालवत आहेत?, असा सवाल विशाल पाटील यांनी केला. राऊत साहेबांनाही सांगलीतील परिस्थिती नेमकी काय आहे हे कळलं असेलच, असंही विशाल पाटील म्हणाले.

शिवसेनेनं सांगलीचीच जागा का मागितली?

देशात लोकसभेच्या १७ निवडणुका झाल्या आहेत. त्यापैकी १६ वेळा सांगलीची जागा काँग्रेसनं जिंकलीय. हा विक्रम आहे. शिवसेनेला पश्चिम महाराष्ट्रात जागा हवी होती तर त्यांनी कोल्हापूर, सोलापूर, पुणे, सातारा यापैकी एखादी जागा का मागितली नाही? सांगलीच का मागितली? हे कोडं काही मला कळत नाही, असंही विशाल पाटील म्हणाले.

WhatsApp channel