मराठी बातम्या  /  निवडणुका  /  congress : प्रकाश आंबेडकर यांची भूमिका भाजपला फायद्याची, बौद्ध समाजात तीव्र नाराजी; भालचंद्र मुणगेकर यांचा हल्लाबोल

congress : प्रकाश आंबेडकर यांची भूमिका भाजपला फायद्याची, बौद्ध समाजात तीव्र नाराजी; भालचंद्र मुणगेकर यांचा हल्लाबोल

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Apr 04, 2024 07:15 PM IST

Bhalchandra Mungekar slams Prakash Ambedkar : महाविकास आघाडीपासून दूर जाण्याच्या प्रकाश आंबेडकर यांच्या निर्णयावर काँग्रेस नेते व माजी खासदार भालचंद्र मुणगेकर यांनी सडकून टीका केली आहे.

प्रकाश आंबेडकरांच्या भूमिकेमुळं बौद्ध समाजात तीव्र नाराजी; भालचंद्र मुणगेकरांचा हल्लाबोल
प्रकाश आंबेडकरांच्या भूमिकेमुळं बौद्ध समाजात तीव्र नाराजी; भालचंद्र मुणगेकरांचा हल्लाबोल

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या बाबतीत प्रकाश आंबेडकर यांनी घेतलेली भूमिका लोकशाही, संविधान आणि खुद्द डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांच्या विरोधी आहे. त्यांची भूमिका भाजपला अनुकूल ठरणारी आहे, अशी टीका काँग्रेस नेते व माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी केली. प्रकाश आंबेडकरांच्या भूमिकेमुळं बौद्ध समाजात तीव्र नाराजी आहे,' असा दावाही मुणगेकर यांनी केला.

ट्रेंडिंग न्यूज

गांधी भवन इथं झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 'प्रकाश आंबेडकर यांनी सुरुवातीपासून भाजपाच्या भूमिकेवर टीका केली होती. भाजप संविधान विरोधी आहे, लोकशाही विरोधी आहे अशी भूमिका ते मांडत होते परंतु प्रत्यक्षात लढण्याची वेळ येताच त्यांनी भाजपला अनुकूल भूमिका घेतली, असं मुणगेकर म्हणाले. 

'वंचित आघाडीला २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ४४ लाख मते पडली होती पण त्यात एमआयएमच्या मतांचा मोठा वाटा होता. विधानसभा निवडणुकीत एमआयएम सोबत नसल्यानं वंचितच्या मतांमध्ये घसरण होत ही मते २१ लाखापर्यंत खाली आली. विधानसभा व लोकसभेत वंचितचा एकही उमेदवार विजयी झाला नाही. लोकसभा निवडणुकीत वंचितमुळं काँग्रेस आघाडीचा ९ जागांवर पराभव झाला तर विधानसभा निवडणुकीत १६ जागांवर पराभव झाला परंतु वंचितमुळं भाजपच्या एकाही उमेदवाराचा पराभव झालेला नाही. यावरून वंचितची भूमिका ही भाजपला फायदेशीर अशीच ठरलेली आहे, याकडं मुणगेकर यांनी लक्ष वेधलं. 

प्रकाश आंबेडकरांची भूमिका सुरुवातीपासूनच संशयास्पद

महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या सुरुवातीलाच प्रकाश आंबेडकरांनी प्रत्येक पक्षाला १२ जागा द्याव्यात अशी सुरुवात केली. त्यांनी साततत्यानं टीका करूनही काँग्रेस पक्षानं त्यांना अत्यंत सन्मानानं १७ मार्च रोजीच्या शिवाजी पार्कवरील इंडिया आघाडीच्या जाहीर सभेला निमंत्रित केलं. त्या सभेत त्यांनी केलेल्या विधानावरून त्यांची भूमिका साशंक आहे हे स्पष्ट झालं होतं. त्यांची एकूण भूमिका पाहता त्यांना खरंच महाविकास आघाडीबरोबर आघाडी करायची होती का, असा प्रश्न मुणगेकर यांनी उपस्थित केला.

इंडिया आघाडीला मतदान करण्याचं आवाहन

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जीवाचे रान करून बनवलेलं संविधान भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला मान्य नाही. सरसंघचालक गोळवलकर यांनी संविधानाचा ‘गोधडी’ असा उल्लेख केला होता. त्यामुळं लोकशाही, संविधान व स्वांतत्र्य वाचवण्यासाठी दलित, वंचित, आदिवासी, अल्पसंख्यांक, महिला, मागासवर्गीय या सर्व समाज घटकांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मरण करून इंडिया आघाडीला मतदान करावं,' अस आवाहन मुणगेकर यांनी केलं. 

प्रकाश आंबेडकरांची भूमिका बाबासाहेबांच्या विचारांच्या विरोधात

लोकसभेची सध्याची निवडणूक देशाच्या लोकशाहीच्या रक्षणासाठी अत्यंत निर्णायक आहे. ती भारतीय जनता पक्ष विरुद्ध इंडिया आघाडी अशी नसून नव फॅसिस्ट शक्ती विरोधातील निवडणूक आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका हिटलरविरोधी आणि लोकशाहीच जनतेला खरा न्याय देऊ शकते अशी होती. या विचारांच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकर यांनी भूमिका घेतली आहे, असा आरोप त्यांनी केला.

WhatsApp channel