मराठी बातम्या  /  elections  /  bacchu kadu : नीतेश राणेंची रक्त तपासणी केली पाहिजे; बच्चू कडू यांची जहरी टीका

bacchu kadu : नीतेश राणेंची रक्त तपासणी केली पाहिजे; बच्चू कडू यांची जहरी टीका

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Apr 01, 2024 03:51 PM IST

Bacchu kadu befitting reply to Nitesh Rane : अमरावतीमधील बंडखोरीला कमी लेखणारे भाजपचे आमदार नीतेश राणे यांना प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी अत्यंत बोचऱ्या शब्दांत प्रत्युत्तर दिलं आहे.

नीतेश राणेंची रक्त तपासणी केली पाहिजे; बच्चू कडू यांची जहरी टीका
नीतेश राणेंची रक्त तपासणी केली पाहिजे; बच्चू कडू यांची जहरी टीका

Bacchu kadu reply to Nitesh Rane अमरावती लोकसभा मतदारसंघात भाजप उमेदवार नवनीत राणा यांच्या विरोधात दंड थोपटणाऱ्या बच्चू कडू यांना डिवचणं भाजपचे आमदार नीतेश राणे यांना महाग पडलं आहे. बच्चू कडू यांनी नीतेश राणे यांना अत्यंत जळजळीत शब्दांत प्रत्युत्तर दिलं आहे. नीतेश राणे यांची रक्त तपासणी केली पाहिजे, असं कडू यांनी म्हटलं आहे.

अमरावती लोकसभा मतदारसंघात भाजपनं नवनीत राणा यांना उमेदवारी दिली आहे. राणा यांच्या उमेदवारीला कडू यांच्या प्रहार संघटनेनं तीव्र विरोध केला आहे. इतकंच नव्हे, कडू यांनी राणा यांच्या विरोधात दिनेश बूब यांची उमेदवारी जाहीरही केली आहे.

कडू यांच्या विरोधावर बोलताना नीतेश राणे यांनी खोचक वक्तव्य केलं होतं. 'बच्चू कडू यांना अजून सागर बंगल्यावरून (देवेंद्र फडणवीस यांचा) फोन गेला नसेल. सगळी वादळं शमवण्याची ताकद आमच्या सागर बंगल्यात आहे, असं सांगून, कडू यांचं बंड फार काळ टिकणार नाही, असा विश्वास नीतेश राणे यांनी व्यक्त केला होता. अमरावतीमध्ये पत्रकारांशी बोलताना कडू यांनी राणेंना सणसणीत उत्तर दिलं.

राजकारणात माझा कोणी बाप नाही!

'राजकारणात बच्चू कडूचा कोणी बाप नाही. त्यांचा बाप असू शकतो. बच्चू कडूचा नाही. नीतेश राणेंनी असं वक्तव्य करू नये. आम्हाला थांबवण्याची ताकद भारतात तरी कोणत्याही नेत्यामध्ये नाही. त्यांना भीती वाटत असेल, आम्हाला कुणाचीही भीती नाही, असं कडू यांनी ठणकावलं. ‘आम्ही सागरातील लाटा आहोत. आम्ही शमणारे नाही. नीतेश राणेंना माहीत नाही. खरंतर त्यांची रक्त तपासणीच केली पाहिजे,’ असा संताप बच्चू कडू यांनी व्यक्त केला.

आमचा नेता मुंबई किंवा दिल्लीत नसतो!

‘बच्चू कडू २० वर्षांपासून अपक्ष लढतोय. ना झेंडा आहे, ना नेता आहे. आम्हाला गुलामीत राहण्याची सवय नाही. हम मर जायेंगे, कर जायेंगे, लेकिन ताकद से लढेंगे. आम्ही जाती, धर्माच्या भरवशावर निवडून येत नाही. आमचा नेता मुंबई आणि दिल्लीत नाही. तो गावात असतो. शेतकरी व शेतमजूर हा आमचा बाप आहे,’ असंही कडू यांनी ठणकावलं.

ब्रह्मदेव खाली आले तरी माघार नाही!

‘युतीचा धर्म आम्ही पाळत नाही असं कुणाला वाटत असेल तर त्यांनी खुशाला आम्हाला युतीतून बाहेर काढावं. आमची लढाई अमरावतीपुरती मर्यादित आहे. ती जागा आम्ही लढणार आणि जिंकणार. ब्रह्मदेव जरी खाली आले तरी आम्ही कुणाला भीत नाही. एकदा ठरवलं की आम्ही कुणाला घाबरत नाही. आम्ही गाडलो गेलो तरी चालेल, पण दिलेला शब्द मोडणार नाही,' असा निर्धार कडू यांनी बोलून दाखवला.

WhatsApp channel