लोकसभेच्या जागावाटपावरून महायुतीत खडाजंगी सुरू असतानाच आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीने (Ajit pawar ncp ) भाजपविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. आपल्या उमेदवाराला मारहाण केल्याप्रकरणी राष्ट्रवादीने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. यामुळे महायुतीतील या दोन प्रमुख पक्षांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस, शिंदेंची शिवसेना व भाजपमध्ये सर्वकाही ठीक चालले असल्याचे दिसत असले तरी जागावाटपावरून विरोधाचे सूरही ऐकू येत आहेत. त्यातच आता अरुणाचल प्रदेशात (Arunachal Pradesh vidhansabha election 2024) राष्ट्रवादी व भाजपमध्ये बिनसले आहे. आपल्या उमेदवाराला मारहाण केल्याची तक्रार राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे.
महाराष्ट्रातील महायुतीमधील जागांचा तिढा सोडवण्यासाठी अजित पवार व फडणवीस तसेच शिंदेंमध्ये बैठकांवर बैठका होत आहेत. मात्र काही जागांचा पेच कायम आहे. लोकसभेसोबत अरुणाचलमध्ये विधानसभेची निवडणूक सुरु आहे. अरुणाचलमध्ये राष्ट्रवादी ८ जागा लढवत आहे. त्यातील एक उमेदवार व अरुणाचलचे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष लिका सय्या यांना भाजप नेत्यांकडून मारहाण झाल्याची घटना रविवारी (७ एप्रिल) घडली होती. या मारहाणीविरोधात आज राष्ट्रवादीने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे.
अजित पवारांच्या राष्ट्रवादीने आपल्या प्रदेशाध्यक्षावर भाजपकडून जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप केला आहे. लिका सय्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार तसेच प्रदेशाध्यक्ष आहेत. राष्ट्रवादीने आरोप केला आहे की, भाजपच्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर हल्ला केला आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना सुरक्षा देण्याची मागणी, राष्ट्रवादीने निवडणूक आयोगाकडे केली आहे.
लिका सय्या हे नानसई येथील उमेदवार आहेत. भाजपच्या उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांनी त्यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे. सय्या हे नानसई मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवत आहेत. रविवारी प्रचार दौरा सुरू असताना भाजपाच्या उमेदवाराने त्यांना मारहाण केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय समन्वयक आणि अरुणाचल प्रदेशचे प्रभारी संजय प्रजापती यांनीही याला दुजोरा दिला असून यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.