Sanjay Dutt : अभिनेता संजय दत्त लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा; यावर खुद्द संजय दत्त म्हणाला…-actor sanjay dutt clarified about contesting loksabha election ,निवडणुका बातम्या
मराठी बातम्या  /  निवडणुका  /  Sanjay Dutt : अभिनेता संजय दत्त लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा; यावर खुद्द संजय दत्त म्हणाला…

Sanjay Dutt : अभिनेता संजय दत्त लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा; यावर खुद्द संजय दत्त म्हणाला…

Apr 08, 2024 03:46 PM IST

राजकीय पक्षात प्रवेश करून लोकसभा निवडणूक लढवण्याच्या वृत्ताचे अभिनेता संजय दत्त याने खंडन केले आहे.

Sanjay Dutt has worked in many films in his career.
Sanjay Dutt has worked in many films in his career.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अभिनेता संजय दत्त लवकरच एका राजकीय पक्षात प्रवेश करून लोकसभा निवडणुकीसाठी उभा राहणार असल्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र संजय दत्त यानेच खुद्द समोर येऊन त्याच्या राजकारण प्रवेशाबाबत खुलासा केला आहे. सोमवारी संजय दत्तने X (पूर्वीचे ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपली भूमिका मांडली आहे. यापूर्वी २०१९ साली सुद्धा अभिनेता संजय दत्त राजकारणात प्रवेश करणार असल्याचे बोलले जात होते. 

२००९-२०१० दरम्यान मुलायम सिंह यांच्या समाजवादी पार्टीचा सरचिटणीस म्हणून काम केलेल्या संजय दत्तबाबत त्याच्या राजकारण प्रवेशाच्या चर्चा अधूनमधून उठत असतात. २०१९ साली संजय दत्त हा महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षात प्रवेश करणार असल्याचे बोलले जात होते.

तूर्तास राजकारणात प्रवेश करणार नाहीः संजय दत्त

दरम्यान, २०२४ची लोकसभा लढण्यासाठी आपण कोणत्याही राजकीय पक्षात प्रवेश करणार नसल्याचं संजय दत्तने स्पष्ट केलं आहे. संजय दत्त म्हणाला, ‘मी राजकारणात येणार ही अफवा आहे. या अफवांना मी पूर्णविराम देऊ इच्छितो. मी कोणत्याही पक्षात प्रवेश करत नाहीए. मी निवडणूकही लढवत नाहीए. जर मी भविष्यात राजकीय क्षेत्रात पाऊल ठेवण्याचा निर्णय घेतलाच तर मी स्वतः सर्वप्रथम त्याची घोषणा करेन. सध्या माझ्या राजकारणातील प्रवेशाबद्दल जे काही बातम्या पसरवल्या जात आहेत, त्या खऱ्या नाहीेए.’

संजय दत्तच्या चाहत्यांनी दिल्या प्रतिक्रिया

दरम्यान, संजय दत्तच्या या स्पष्टीकरणानंतर त्याच्या चाहत्यांनी विविध प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका चाहत्याने लिहिले, ‘राजकारणात किंवा कोणत्याही राजकीय पक्षात येऊ नकोस. तू एक उत्तम अभिनेता आहेस आणि आम्हाला तुला उर्वरित काळात एक अभिनेता म्हणून पाहायचे आहे. एक उत्तम अभिनेता म्हणून तू आमच्या हृदयात आहेस.’

X वर आणखी एका चाहत्याने प्रतिक्रिया दिली. ‘प्लीज राजकारणात येऊ नका... सेलिब्रेटींसाठी हे वाईट क्षेत्र आहे. तुम्ही चित्रपटांमध्ये उत्तम काम करत आहात. तुमचा चाहता म्हणून मी विनंती करतो की कृपया निवडणुकीत उभे राहणे टाळा. आपल्या निर्णयाचे स्वागत आहे’ असं या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

संजय दत्त आणि राजकारण

राजकारणात प्रवेश करण्याच्या अफवांचे खंडन करण्याची संजय दत्तची ही पहिलीच वेळ नाही. २०१९ मध्ये महाराष्ट्रातील तत्कालिन पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा झाली होती. परंतु संजय दत्तने ते वृत्त नाकारले होते. २००९  साली समाजवादी पक्षाकडून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी संजय दत्त तयार झाला होता. परंतु कोर्टाच्या निर्णयामुळे माघार घ्यावी लागली होती. त्यानंतर संजय दत्तची समाजवादी पक्षाच्या सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली होती. मात्र वर्षभरानंतर, डिसेंबर २०१० मध्ये त्याने हे पद सोडले होते. संजय दत्तचे वडील दिवंगत अभिनेते सुनील दत्त हे काँग्रेसचे खासदार होते. संजय दत्तची आई नर्गिस या राज्यसभेच्या खासदार होत्या. तर बहिण प्रिया दत्त या सुद्धा कॉंग्रेसच्या लोकसभा खासदार होत्या.

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये अनेक अभिनेते, अभिनेत्री निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. अभिनेत्री कंगना राणावत हिने भाजप उमेदवार म्हणून हिमाचल प्रदेशातील मंडी मतदारसंघातून अर्ज भरला आहे. तर अभिनेता गोविंदा याने शिवसेना (शिंदे गट) प्रवेश केला आहे. 

संजय दत्तचा 'द व्हर्जिन ट्री' प्रदर्शनासाठी तयार

संजय दत्त आगामी ‘द व्हर्जिन ट्री’ या चित्रपटात भूमिका असून हा विनोदी भयपट आहे. या चित्रपटात सनी सिंग, मौनी रॉय आणि पलक तिवारी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. अक्षय कुमार, सुनील शेट्टी, परेश रावल आणि दिशा पटानी यांच्यासोबत 'वेलकम टू द जंगल' या चित्रपटातही संजय दत्त भूमिका वठवतोय. ‘वेलकम टू द जंगल’ हा चित्रपट २० डिसेंबर २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे. 

Whats_app_banner