टी इंडिया सध्या इंग्लंडविरुद्ध ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यात व्यस्त आहे. मालिकेतील पहिला हैदराबाद कसोटी सामना इंग्लंडने जिंकला. मात्र, यानंतर भारताने दमदार पुनरागमन करत या मालिकेतील पुढचे तिन्ही सामने जिंकून मालिका खिशात घातली.
टीम इंडिया या मालिकेत ३-१ ने आघाडीवर असून मालिकेतील शेवटचा सामना ७ मार्चपासून धरमशाला येथे खेळला जाणार आहे.
इंग्लंड मालिकेनंतरही टीम इंडियाला विश्रांती मिळणार नाही. ही मालिका संपल्यानंतर लगेच इंडियन प्रीमियर लीग (IPL 2024) सुरू होणार आहे. आयपीएलनंतर लगेचच टी-20 विश्वचषक २०२४ खेळला जाणार आहे.
तसे पाहिले तर पुढील १५ महिने भारतीय संघासाठी खूप महत्त्वाचे असणार आहेत. या १५ महिन्यांत आयसीसीच्या तीन मोठ्या स्पर्धा होणार आहेत.
टीम इंडियाची पहिली मोठी परिक्षा टी-20 वर्ल्डकपमध्ये होणार आहे. आगामी T20 विश्वचषक १ जून ते २९ जून दरम्यान वेस्ट इंडिज आणि यूएसएमध्ये खेळवला जाणार आहे.
यानंतर पुढील वर्षी (२०२५) फेब्रुवारी-मार्च महिन्यात आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन केले जाईल. चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चे यजमानपद पाकिस्तानला मिळाले आहे.
यानंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची (WTC) फायनल रंगणार आहे. हा सामना जून २०२५ मध्ये इंग्लंडच्या लॉर्ड्सवर रंगणार आहे.
विशेष म्हणजे सलग तिसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना इंग्लंडमध्ये खेळवला जाणार आहे. याआधीही २०२१ आणि २०२३ च्या WTC फायनल इंग्लंडमध्येच खेळल्या गेल्या होत्या.
या दोन्ही फायनलमध्ये टीम इंडियाचा पराभव झाला होता. मात्र, आता म्हणजेच तिसऱ्यांदा भारतीय संघ WTC फायनलमध्ये पोहोचतो की नाही हे पाहणे बाकी आहे.
तसं पाहिलं तर भारतीय संघ ११ वर्षांपासून आयसीसीचं एकही विजेतेपद मिळवू शकलेला नाही. भारताने २०१३ मध्ये शेवटचे आयसीसीचे विजेतेपद पटकावले होते. त्यावेळी महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. त्या चॅम्पियन्स ट्रॉफीपासून भारतीय संघाने १० आयसीसी स्पर्धा खेळल्या आहेत. या काळात टीम इंडिया ५ वेळा फायनल आणि ४ वेळा सेमीफायनल खेळली आहे. पण प्रत्येकवेळी पराभवाचे तोंड पाहावे लागले आहे.