IPL 2024: मार्कस स्टॉयनिसच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर लखनौ सुपर जायंट्सने मुंबई इंडियन्सचा चार विकेट्सने पराभव केला. लखनौने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मुंबईने २० षटकांत सात विकेट्स गमावून १४४ धावा केल्या. प्रत्युत्तरात लखनौने पाहुण्यांना पराभवाची धुळ चारली.
नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या मुंबई इंडियन्सच्या फलंदाजीला या सामन्यात काही खास कामगिरी करता आली नाही. मुंबईने पॉवरप्लेमध्ये २७ धावांवर चार विकेट्स गमावल्या. रोहित शर्मा (४ धावा), सूर्यकुमार यादव (१० धावा), तिलक वर्मा (७ धावा) आणि कर्णधार हार्दिक पांड्या एकही धाव न काढता पॅव्हेलियनमध्ये परतला.
यानंतर इशान किशन आणि नेहल वढेरा यांनी संघाचा डाव पुढे नेला. दोघांमध्ये ५३ धावांची भागीदारी झाली. १४ व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर रवी बिश्नोईने इशान किशनला झेलबाद केले. इशान किशनने ३२ धावा केल्या. तर, नेहल वढेराने ४६ धावांचे योगदान दिले. त्याला मोहसीन खानने बोल्ड केले. टीम डेव्हिडने शेवटच्या षटकात १७ धावा चोरल्या.
मुंबईच्या संघाने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या लखनौच्या संघाची सुरूवात खराब झाली. लखनौने १०० धावांच्या आत तीन विकेट्स गमावले. मात्र, त्यानंतर मार्कस स्टायनिसने संघाचा डाव सावरला. त्याने अवघ्या ३९ चेंडूत ५० धावा ठोकल्या. या हंगामातील हे त्याचे दुसरे अर्धशतक ठरले. या सामन्यात तो ४५ चेंडूत ६२ धावा करून बाद झाला. ज्यात सात चौकार आणि दोन षटकारांचा समावेश आहे. निकोलस पूरन आणि क्रुणाल पांड्याने अखरेच्या षटकात लखनौला विजय मिळवून दिला.
लखनौविरुद्ध पराभवानंतर मुंबईचा प्लेऑफ गाठण्याचा मार्ग खडतर झाला आहे. मुंबईने आतापर्यंत खेळलेल्या १० सामन्यापैकी फक्त तीन सामने जिंकले आहेत. तर, सात सामन्यात त्यांचा पराभव झाला आहे. मुंबईला त्यांचे पुढील चारही सामने मोठ्या फरकाने जिंकूनही प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी इतर संघाच्या कामगिरीवर अवलंबून राहावे लागणार आहे.
संबंधित बातम्या