T20 World Cup 2024: भारतीय नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयने नुकतीच टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा केली. भारताचा स्टार फलंदाज रोहित शर्माकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. तर, हार्दिक पांड्या उपकर्णधाराची भूमिका बजावणार आहे. याशिवाय, गेल्या अनेक दिवसांपासून संघाबाहेर असलेला ऋषभ पंत आणि युजवेंद्र चहल यांना भारताच्या टी-२० विश्वचषक संघात स्थान देण्यात आले. तर, विकेटकिपर संजू सॅमसनचाही संघात समावेश करण्यात आला. मात्र, केएल राहुलला संघातून वगळण्यात आले. आयपीएलमध्ये चांगल्या फॉर्ममध्ये असलेल्या केएल राहुलला संघातून वगळण्यात आल्याने सोशल मीडियावर वेगळीच चर्चा रंगली आहे.
केएल राहुल आयपीएलमध्ये लखनऊ सुपर जायंट्सच्या संघाचे नेतृत्व करतो. त्याने आयपीएलच्या यंदाच्या हंगामात ९ सामन्यात ३७८ धावा केल्या आहेत. ज्यात तीन अर्धशतकांचा समावेश आहे. केएल राहुल चांगल्या फॉर्ममध्ये असताना बीसीसीआय निवड समितीने केएल राहुलची भारताच्या टी- २० संघात निवड केली नाही.
भारतीय क्रिकेट निवड समितीने ऋषभ पंत आणि संजू सॅमसनला यष्टीरक्षक म्हणून संघात स्थान दिले. पंत आणि सॅमसन दोघेही स्फोटक फलंदाजीसाठी ओळखले जातात. आयपीएलमध्ये या दोघांची कामगिरी राहुलपेक्षा थोडी चांगली झाली आहे. पंतने ११ सामन्यात ३९८ धावा केल्या आहेत. तर, सॅमसनने नऊ सामन्यात ३८५ धावा केल्या आहेत. स्ट्राईक रेटच्या बाबतीत पंत-सॅमसन केएल राहुलच्या पुढे आहेत. यामुळेच निवड समितीने केएल राहुलऐवजी पंत आणि सॅमसनला प्राधान्य दिले.
केएल राहुलचा आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये चांगला रेकॉर्ड आहे. त्याने भारतासाठी ७२ टी२० सामने खेळले आहेत. या कालावधीत त्याने २ हजार २६५ धावा केल्या आहेत. राहुलने या फॉरमॅटमध्ये दोन शतके आणि २२ अर्धशतके केली आहेत. त्याने ७५ एकदिवसीय सामन्यांमध्ये २ हजार ८२० धावा केल्या आहेत. राहुलने वनडे फॉरमॅटमध्ये सात शतके आणि १८ अर्धशतके केली. महत्त्वाची बाब म्हणजे, केएल राहुल २०२२ पासून भारताच्या टी-२० संघातून बाहेर आहे.