मराठी बातम्या  /  क्रीडा  /  RR vs SRH : संदीप शर्माचा नो-बॉल राजस्थानला महागात पडला, अब्दुल समदचा शेवटच्या चेंडूवर विजयी षटकार

RR vs SRH : संदीप शर्माचा नो-बॉल राजस्थानला महागात पडला, अब्दुल समदचा शेवटच्या चेंडूवर विजयी षटकार

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
May 07, 2023 11:23 PM IST

vs SRH, IPL 2023 Score : आयपीएलच्या रोमांचक सामन्यात सनरायझर्स हैदराबादने राजस्थान रॉयल्सचा 4 गडी राखून पराभव केला. जयपूर येथे ७ मे (रविवार) रोजी झालेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना राजस्थानने २ बाद २१४ धावा केल्या. प्रत्युत्तरात सनरायझर्स हैदराबादने शेवटच्या चेंडूवर लक्ष्य गाठले.

RR vs SRH
RR vs SRH

आयपीएलच्या एका रोमांचक सामन्यात सनरायझर्स हैदराबादने राजस्थान रॉयल्सचा ४ गडी राखून पराभव केला. जयपूर येथे झालेल्या सामन्यात राजस्थानने सनरायझर्सला विजयासाठी २१५ धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात सनरायझर्स हैदराबादने शेवटच्या चेंडूवर लक्ष्य गाठले. 

ट्रेंडिंग न्यूज

सनरायझर्सला विजयासाठी शेवटच्या चेंडूवर ५ धावा करायच्या होत्या. शेवटच्या चेंडूवर संदीप शर्माने अब्दुल समदला बाद केले, पण तो नो-बॉल ठरला. यानंतर सनरायझर्सला फ्री-हिट मिळाला, त्यावर अब्दुल समदने षटकार ठोकत संघाला विजय मिळवून दिला.

लक्ष्याचा पाठलाग करताना सनरायझर्स हैदराबादने दमदार सुरुवात केली. इम्पॅक्ट प्लेयर म्हणून फलंदाजीला उतरलेल्या अनमोलप्रीत सिंगने अभिषेक शर्मासह ५.५ षटकांत ५१ धावांची भागीदारी केली. युझवेंद्र चहलने अनमोलप्रीतला हेटमायरकडे झेलबाद करून ही भागीदारी मोडली. अनमोलप्रीतने २५ चेंडूत ३३ धावा केल्या. अनमोलप्रीत बाद झाल्यानंतर राहुल त्रिपाठीने अभिषेक शर्मासोबत ६५ धावांची भागीदारी केली. अभिषेक शर्माने ५ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ५५ धावांची शानदार खेळी केली.

यानंतर क्रीजवर आलेल्या हेनरिक क्लासेनने चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडण्यास सुरुवात केली. मात्र, त्याची खेळी फार काळ टिकली नाही. युझवेंद्र चहलने बटलरकरवी क्लासेनला झेलबाद केले. यानंतर चहलने एकाच षटकात राहुल त्रिपाठी आणि एडन मार्करामचे विकेट घेत राजस्थानला सामन्यात परत आणले.

राजस्थानचा डाव

नाणेफेक जिंकल्यानंतर राजस्थान रॉयल्सने प्रथम फलंदाजी करताना दमदार सुरुवात केली. यशस्वी जैस्वाल आणि जोस बटलर यांनी मिळून ५ षटकात ५४ धावांची भागीदारी केली. या भागीदारीत यशस्वी जैस्वालचे योगदान अधिक होते. मार्को यानसेनने यशस्वी जैस्वालला बाद करून ही भागीदारी संपुष्टात आणली. यशस्वीने ५ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ३५ धावांची खेळी केली.

पहिला विकेट पडल्यानंतर जोस बटलर आणि कर्णधार संजू सॅमसन यांनी धावांचा पाऊस पाडला. जोस बटलर दुर्दैवी ठरला तो शतकी खेळीपासून केवळ ५ धावा दूर असताना बाद झाला. बटलरने ५९ चेंडूंत १० चौकार आणि चार षटकारांसह ९५ धावांची खेळी केली. डावाच्या १९व्या षटकात भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीवर बटलर एलबीडब्ल्यू आऊट झाला. बटलर आणि सॅमसन यांच्यात १३८ धावांची भागीदारी झाली. संजूने ३८ चेंडूत नाबाद ६८ धावा केल्या. संजूने आपल्या खेळीत ५ षटकार आणि ४ चौकार लगावले.

WhatsApp channel