Dinesh Karthik : रोहित शर्माच्या प्लॅनमध्ये कार्तिक फिट! वर्ल्डकपपूर्वी डीकेला मिळणार 'ही' जबाबदारी
टीम इंडियाने टी-20 वर्ल्डकपपूर्वी आपले जवळपास सर्व प्रयोग केले आहेत. घरच्या मैदानावर भारताने ऑस्ट्रेलियाचा २-१ असा पराभव केला. त्यानंतर भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेच्या संघाशी दोन हात करणार आहे. त्याआधी आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत दिनेश कार्तिकला अधिक संधी देण्यात येईल, असे कर्णधार रोहित शर्माने सांगितले आहे.
टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने पुढील महिन्यात ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-20 विश्वचषकासाठी आपली रणनीती काटेकोरपणे राबवण्यास सुरुवात केली आहे. त्याला यष्टिरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकला फलंदाजीसाठी अधिक वेळ द्यायचा आहे. भारत प्लेइंग इलेव्हनमध्ये कार्तिक आणि ऋषभ पंत यांच्यापैकी एकाची निवड करत आहे. आशिया कपमध्ये पंतची प्लेईंग इलेव्हनमध्ये निवड झाली होती, तर कार्तिकला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिन्ही सामन्यांमध्ये संधी देण्यात आली होती.
ट्रेंडिंग न्यूज
कार्तिकला अधिक वेळ द्यायला हवा
तीन सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाला पराभूत केल्यानंतर कर्णधार रोहित शर्माने पत्रकार परिषदेत सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरे दिली. यावेळी त्याने कार्तिक आणि पंत यांच्यावरही भाष्य केले. तो म्हणाला की, ‘मला विश्वचषकापूर्वी या दोन खेळाडूंना जास्तीत जास्त संधी द्यायची आहे. तसेच, दिनेश कार्तिकला आणखी वेळ देण्याची गरज आहे’, असे रोहित म्हणाला.
कार्तिकला वरच्या क्रमांकावर फलंदाजीची जबाबदारी मिळू शकते
त्यामुळे आता कार्तिकला आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत वरच्या क्रमांकावर फलंदाजीची संधी मिळू शकते, अशी चर्चा रंगू लागली आहे. कारण कार्तिकला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या संपूर्ण मालिकेत केवळ ८ चेंडू खेळायला मिळाले. तर पंतने एक सामना खेळला, पण त्याला फलंदाजीची संधी मिळाली नाही.
भारतीय संघ आता दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20 मालिका खेळणार आहे आणि रोहितने सांगितले की, कार्तिक आणि पंत यांचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करणे परिस्थितीवर अवलंबून असेल.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध परिस्थितीनुसार दोघांना संधी दिली जाईल
सोबतच तो म्हणाला, 'दक्षिण आफ्रिकेविरुद्ध काय होईल हे मला माहीत नाही. त्यांची गोलंदाजी पाहावी लागेल. आम्हाला फलंदाजीत लवचिकता हवी आहे. परिस्थितीनुसार डाव्या हाताच्या फलंदाजाला मैदानात उतरवायचे असेल तर आम्ही ते करू आणि उजव्या हाताच्या फलंदाजाची गरज भासल्यास त्याला मैदानात उतरवले जाईल. या सर्वांच्या मॅनेजमेंटबाबत अत्यंत सावधगिरी बाळगावी लागेल.
संबंधित बातम्या