भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात रविवारी हैदराबादमध्ये तिसरा टी-२० सामना सुरु आहे. या निर्णायक सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजीस आमंत्रित केले. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात १८६ धावा केल्या.
मात्र, ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज फलंदाज ग्लेन मॅक्सवेल या निर्णायक सामन्यातही पूर्णपणे फ्लॉप ठरला. त्याने ११ चेंडूत ६ धावा केल्या. तो धावबाद झाला. अक्षर पटेलच्या थ्रोवर मॅक्सवेल थोड्या हटके पद्धतीने धावाबाद झाला. या विकेटची बरीच चर्चा रंगली आहे.
मॅक्सवेल नेमका कसा बाद झाला?
हा सर्व नाटकीय प्रसंग डावाच्या ८व्या षटकात घडला. या षटकातील चौथ्या चेंडूवर मॅक्सवेलने धाव घेण्याच्या प्रयत्न केला. मात्र, अक्षर पटेलने सीमारेषेजवळून फेकलेला चेंडू थेट स्टम्प्सवर येऊन आदळला. पण चेंडू थेट स्टम्प्सला लागण्याआधीच विकेटकीपर कार्तिकचा हात स्टम्प्सला लागला. त्यामुळे बेल्स उडाल्या. हे सर्व मोठ्या स्क्रीनवर पाहून सर्व भारतीय खेळाडूंनी आणि चाहत्यांनी मॅक्सवेलला बाद देण्याची अपेक्षा सोडून दिली होती. मात्र तिसऱ्या पंचांनी दुसरी बेल्स हाताने उडाली की चेंडूने हे तपासण्यास सांगितले.
त्यानंतर रिप्लेत कार्तिकच्या ग्लोजमुळे पहिली बेल्स पडली होती तर दुसरी बेल्स अजून स्टम्प्सवरच होती हे स्पष्ट झाले.
विशेष म्हणजे अक्षर पटेलचा थ्रो त्या दुसऱ्या बेल्सवरच जावून आदळला. अक्षरचा थ्रो दुसऱ्या बेल्सला लागला त्यावेळी मॅक्सवेलची बॅट क्रीझबाहेर होती आणि कार्तिकचा हात लागलेली बेल्स स्टम्प्सवरच होती. चेंडू लागल्यानंतरच ती बेल्स उडाली, हे रिप्लेत स्पष्ट झाले. त्यानंतर पंचांनी मॅक्सवेल बाद असल्याचे घोषित केले.
नियमानुसार जर चेंडू स्टम्पला लागण्यापूर्वीच एक बेल्स पडली असेल तर त्यावेळी धावबाद करण्यासाठी दुसरी बेल्स उडवणे गरजचे असते. अक्षरच्या थ्रोने दुसरी बेल्स उडवली.
भारतासमोर १८७ धावांचे लक्ष्य
दरम्यान, ऑस्ट्रेलियाने भारतासमोर १८७ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ७ गड्यांच्या मोबदल्यात १८६ धावा केल्या. कॅमेरून ग्रीनने २१ चेंडूत ५२ तर टीम डेव्हिडने २७ चेंडूत ५४ धावा केल्या. त्याचवेळी भारताकडून अक्षर पटेलने ३ बळी घेतले.
दोन्ही प्लेइंग-११
टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, युझवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह.
ऑस्ट्रेलिया : अॅरॉन फिंच (कर्णधार), जोस इंग्लिस, स्टीव्हन स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल, मॅथ्यू वेड (विकेटकीपर), टिम डेव्हिड, कॅमरुन ग्रीन, अॅडम झाम्पा, पॅट कमिन्स, जोस हेझलवूड, नॅथन एलिस.
संबंधित बातम्या