टीम इंडियाने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 मालिका जिंकली आहे. तिसऱ्या सामन्यात भारताने कांगारूंचा ६ गडी राखून पराभव केला. अशा प्रकारे भारतीय संघाने मालिका २-१ अशी खिशात घातली. या सामन्यात प्रथम खेळताना ऑस्ट्रेलियाने ७ गड्यांच्या मोबदल्यात १८६ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात टीम इंडियाने १९.५ षटकांत ४ गड्यांच्या मोबदल्यात हे लक्ष्य गाठले.
दरम्यान, टीम इंडियाचा यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या मालिकेत केवळ ३ चेंडूं खेळायला मिळाले. पण कार्तिक पहिल्या सामन्यापासूनच चर्चेत राहिला.
पहिल्या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा डीआरएसवरुन त्याच्यावर नाराज होता. त्यावेळी रोहितने कार्तिकचा गळाही पकडला होता. या मजेशीर प्रसंगाचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले. तर दुसऱ्या सामन्यात रोहित शर्मा विजयाचा हिरो ठरला. मात्र, सामना कार्तिकने एक षटकार आणि एक चौकार मारुन संपवला. त्यानंतर कर्णधार रोहितने कार्तिकला घट्ट मिठी मारली, या प्रसंगाचे फोटोही तुफान व्हायरल झाले होते. तसेच, तिसऱ्या सामन्यात कार्तिकने मॅक्सवेलला रनआऊट केले. यानंतर रोहितने जाऊन डीकेच्या हेल्मेटचे चुंबन घेतले. या मालिकेतील हे तिन्ही प्रसंग प्रचंड चर्चेत राहिले. यावर अनेक मीम्सदेखील बनवले जात आहेत.
दिनेश कार्तिकने देखील हे तीन व्हायरल झालेले फोटो आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केले आहे. सोबतच लिहिले आहे की, 'what's the endgame here'
दरम्यान, डीके एवढ्यावरच थांबला नाही. त्याने आणखी एक स्टोरी शेअर केली आहे. या स्टोरीमध्ये त्याने रोहित आणि त्याच्यावर बनलेले मीम शेअर केले आहे. हे मीम कार्तिकला प्रचंड आवडलेले आहे.
दिनेश कार्तिक २०२२ च्या T20 विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाचा भाग आहे आणि कर्णधार रोहित शर्मा त्याला जास्तीत जास्त संधी देऊ इच्छित आहे.