मराठी बातम्या  /  क्रीडा  /  DC VS SRH : मुकेश कुमारने शेवटच्या ६ चेंडूंवर सामना फिरवला, दिल्लीने हैदराबादला अवघ्या ७ धावांनी हरवले

DC VS SRH : मुकेश कुमारने शेवटच्या ६ चेंडूंवर सामना फिरवला, दिल्लीने हैदराबादला अवघ्या ७ धावांनी हरवले

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Apr 25, 2023 10:35 AM IST

SRH vs DC Highlights : आयपीएल २०२३ च्या ३४व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने (DC) सनरायझर्स हैदराबादचा (SRH) ७ धावांनी पराभव केला. दिल्लीचा हा सलग दुसरा विजय आहे.

SRH vs DC Indian Premier League 2023
SRH vs DC Indian Premier League 2023

SRH vs DC Indian Premier League 2023 Highlights : आयपीएल २०२३च्या रोमांचक सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने (DC) सनरायझर्स हैदराबादचा (SRH) ७ धावांनी पराभव केला. हैदराबादमध्ये झालेल्या सामन्यात दिल्लीने विजयासाठी १४५ धावांचे लक्ष्य दिले होते, मात्र संपूर्ण षटके खेळूनही यजमान हैदराबादला हे लक्ष्य गाठता आले नाही.

ट्रेंडिंग न्यूज

हैदराबादला शेवटच्या दोन षटकात २३ धावांची गरज होती. त्यावेळी वॉशिंग्टन सुंदर आणि हेनरिक क्लासेन क्रीजवर होते. १९व्या षटकात १० धावा झाल्या आणि संघाने क्लासेनची विकेट गमावली. यानंतर हैदराबादला शेवटच्या षटकात १३ धावांची गरज होती. मुकेश कुमार गोलंदाजीला आला. वॉशिंग्टन सुंदर आणि मार्को जॅन्सन क्रीजवर होते.

सुंदरने पहिल्याच चेंडूवर दोन धावा घेतल्या. यानंतर पुढचा चेंडू डॉट गेला. तिसऱ्या चेंडूवर मुकेशने एकेरी दिली. चौथ्या चेंडूवर यानसेनने एकच धाव घेतली. पाचव्या चेंडूवर मुकेशने एकेरी दिली. त्याचवेळी दिल्लीला शेवटच्या चेंडूवर ८ धावांची गरज होती, जी जवळपास अशक्य होती. शेवटच्या चेंडूवर मुकेशने एकही धाव दिली नाही. अशाप्रकारे दिल्लीने ७ धावांनी विजय मिळवला.

तत्पूर्वी, लक्ष्याचा पाठलाग करताना, सनरायझर्सची सुरुवात चांगली झाली नाही कारण त्यांनी हॅरी ब्रूकची विकेट स्वस्तात गमावली. ब्रुकने केवळ ७ धावा केल्या. ब्रुकला एनरिक नॉर्खियाने बाद केले. यानंतर मयंक आणि राहुल त्रिपाठी यांच्यात दुसऱ्या विकेटसाठी ३८ धावांची भागीदारी झाली, ज्यामध्ये मयंकने अधिक योगदान दिले. मयंक ४९ धावा करून अक्षर पटेलच्या चेंडूवर झेलबाद झाला.

यानंतर सनरायझर्सने राहुल त्रिपाठी, अभिषेक शर्मा आणि कर्णधार एडन मार्कराम यांच्या विकेट्स स्वस्तात गमावल्या. ८५ धावांत ५ विकेट पडल्यानंतर हेनरिक क्लासेन आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्यात ४१ धावांची भागीदारी झाली. क्लासेन खूपच तुफानी फलंदाजी करत होता. पण १९व्या षटकात तो झेलबाद झाला आणि सामना दिल्लीच्या दिशेने फिरला. हेनरिक क्लासेनने १९ चेंडूत ३१ धावांची खेळी खेळली.

दिल्लीचा डाव

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना दिल्लीची सुरुवात खूपच खराब झाली. पहिल्याच षटकात भुवनेश्वरने फिलिप सॉल्टला यष्टिरक्षक क्लासेनवी झेलबाद केले. सॉल्टला खातेही उघडता आले नाही. यानंतर कर्णधार डेव्हिड वॉर्नर आणि मिचेल मार्श यांनी दुसऱ्या विकेटसाठी ३८ धावांची भागीदारी केली. मिशेलला टी नटराजनने एलबीडब्ल्यू आऊट केले. मार्शला १५ चेंडूत ५ चौकारांच्या मदतीने २५ धावा करता आल्या. यानंतर वॉशिंग्टन सुंदरची घातक गोलंदाजी पाहायला मिळाली. आठव्या षटकात त्याने ३ बळी घेतले. सर्वप्रथम सुंदरने वॉर्नरला हॅरी ब्रूककरवी झेलबाद केले.

त्याला २० चेंडूत २ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने २१ धावा करता आल्या. यानंतर सरफराजने खराब शॉट खेळून आपली विकेट गमावली. त्याने भुवनेश्वरकडे झेल सोपवला. सर्फराजला नऊ चेंडूत १० धावा करता आल्या. यानंतर फलंदाजीला आलेला अमन हकीम खानही त्याच षटकाच्या शेवटच्या चेंडूवर बाद झाला. सुंदरने त्याला अभिषेक शर्माकरवी झेलबाद केले. अमनला ४ धावा करता आल्या.

६२ धावांत ५ विकेट पडल्यानंतर मनीष पांडे आणि अक्षर पटेल यांनी सहाव्या विकेटसाठी ६० चेंडूत ६९ धावांची भागीदारी केली. अक्षर पटेल १८व्या षटकात बाद झाला. त्याला भुवनेश्वरने क्लीन बोल्ड केले. अक्षरने ३४ चेंडूंत ४ चौकारांच्या मदतीने ३४ धावांची खेळी खेळली. यानंतर मनीष पांडेही धावबाद झाला. त्याला २७ चेंडूंत २ चौकारांच्या मदतीने ३४ धावा करता आल्या. यानंतर दिल्ली कशीबशी १४४ धावांपर्यंत पोहोचली.

हैदराबादच्या गोलंदाजांची चमकदार कामगिरी. भुवनेश्वरने चार षटकांत ११ धावा देत दोन बळी घेतले. त्याचवेळी वॉशिंग्टन सुंदरने चार षटकांत २८ धावा देत तीन बळी घेतले. टी नटराजनने तीन षटकांत २१ धावा देत मिचेल मार्शची महत्त्वपूर्ण विकेट घेतली.

WhatsApp channel