Karnataka Assembly Polls 2023 : कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली आहे. भाजपमधील बंडाळीमुळं ही निवडणूक सध्या गाजत असून लक्ष्मण सावदी हे नाव चर्चेत आघाडीवर आहे. येडीयुरप्पा सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असलेले सावदी यांना भाजपनं तिकीट नाकारल्यामुळं त्यांनी थेट काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळं भाजपची डोकेदुखी वाढली आहे.
लक्ष्मण सावदी हे सध्या भाजपकडून विधान परिषदेत आमदार आहेत. बेळगाव जिल्ह्यातील अटानी मतदारसंघातून तीन वेळा निवडून आलेले सावदी हे २०१८ च्या निवडणुकीत पराभूत झाले होते. त्यावेळी काँग्रेसमध्ये असलेल्या महेश कुमथल्ली यांनी सावदी यांचा पराभव केला होता. मात्र, त्यानंतरच्या राजकीय उलथापालथीच्या काळात कुमथल्ली यांनी भाजपमध्ये प्रवेश करून काँग्रेस-जेडीएस आघाडीचं सरकार पाडण्यास हातभार लावला होता.
सावदी हे कर्नाटकातील एक वजनदार राजकीय नेते आहेत. भाजपशी ते अनेक वर्षांपासून एकनिष्ठ होते. २०१८ साली त्यांचा पराभव झाला असला तरी राज्याच्या अन्य भागांत भाजपचे उमेदवार निवडून आणण्यासाठी त्यांनी प्रचंड मेहनत घेतली होती. त्यामुळंच काँग्रेस-जेडीएसचं सरकार जाऊन आलेल्या येडियुरप्पा सरकारमध्ये सावदी यांना उपमुख्यमंत्रीपद देण्यात आलं होतं. तसंच, त्यांनी परिवहन मंत्री म्हणूनही काम पाहिलं होतं.
सावदी आणि वाद
सावदी हे काही वर्षांपूर्वी मोठ्या वादात अडकले होते. २०१२ साली कर्नाटक विधानसभेत सावदी व त्यांचे सहकारी आमदार सी सी पाटील हे मोबाइल फोनवर अश्लिल क्लिप पाहत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या घटनेमुळं मोठा राजकीय वाद निर्माण झाल्यानंतर सावदी यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी येत्या १० मे रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. निवडणुकीचा निकाल १३ मे रोजी लागणार आहे.
संबंधित बातम्या