मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Karnataka Poll : मोदी-शहांच्या निर्णयाला आव्हान देत कर्नाटकचे माजी उपमुख्यमंत्री थेट काँग्रेसमध्ये

Karnataka Poll : मोदी-शहांच्या निर्णयाला आव्हान देत कर्नाटकचे माजी उपमुख्यमंत्री थेट काँग्रेसमध्ये

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Apr 14, 2023 03:10 PM IST

Laxman Savadi Joins Congress : कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर करताच भाजपला मोठा धक्का बसला आहे.

Laxman Savadi
Laxman Savadi

Karnataka Vidhan Sabha Polls : कर्नाटकातील सत्ता राखण्यासाठी जोरदार प्रयत्न करणाऱ्या भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला आहे. भाजप हायकमांडनं तिकीट नाकारल्यानं संतापलेले माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सावदी यांनी भाजपला 'राम राम' करत थेट काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

कर्नाटकमध्ये येत्या १० मे रोजी विधानसभा निवडणुकीचं मतदान होणार आहे. निवडणुकीचा निकाल १३ मे रोजी लागणार आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजप, काँग्रेस व जेडीएस या प्रमुख पक्षांनी उमेदवार घोषित करायला सुरुवात केली आहे. बऱ्याच वाटाघाटीनंतर भाजपनं १८९ उमेदवार जाहीर केले. उमेदवारी जाहीर होताच भाजपमध्ये बंडाळी झाली. ज्येष्ठ नेते जगदीश शेट्टर, कुमारस्वामी व लक्ष्मण सावदी यांनी थेट बंडाचं निशाण फडकावलं. माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सावदी यांनी पहिल्याच दिवशी भाजपचा राजीनामा दिला होता. त्यानंतर आज त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

तत्पूर्वी, सावदी यांनी काँग्रेस नेते डी. के. शिवकुमार व माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या या दोन्ही नेत्यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीनंतर शिवकुमार यांनीच सावदी यांच्या प्रवेशाची माहिती दिली. 'सावदी यांनी काँग्रेस प्रवेश करताना कुठलीही अट घातलेली नाही. भाजपमध्ये अपमानित करण्यात आल्याची त्यांची भावना आहे. त्यांच्यासारख्या मोठ्या नेत्याला काँग्रेसमध्ये स्थान देणं हे आमचं कर्तव्यच आहे. भाजपचे आणखी ९ ते १० आमदार आमच्या संपर्कात आहेत, मात्र त्यांना सामावून घेण्यात काही अडचणी आहेत, असंही शिवकुमार यांनी सांगितलं.

लक्ष्मण सावदी हे अटानी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास इच्छुक होते. मात्र, भाजपनं त्या जागेवरून विद्यमान आमदारालाच पुन्हा संधी दिली. त्यामुळं सावदी यांनी बंड केलं. त्यांच्याप्रमाणेच सुलिया मतदारसंघातून सहा वेळा निवडून आलेले आमदार एस अंगारा, आमदार आर शंकर, मुदिगेरीचे आमदार कुमारस्वामी, गुलीहट्टी शेखर यांनीही पक्ष सोडला आहे. त्यांनाही पक्षानं तिकीट नाकारलं आहे.

IPL_Entry_Point

विभाग