What is Cypher : पाकिस्तानात इम्रान खानला १० वर्ष शिक्षेसाठी कारणीभूत ‘सायफर प्रकरण' आहे तरी काय?
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  What is Cypher : पाकिस्तानात इम्रान खानला १० वर्ष शिक्षेसाठी कारणीभूत ‘सायफर प्रकरण' आहे तरी काय?

What is Cypher : पाकिस्तानात इम्रान खानला १० वर्ष शिक्षेसाठी कारणीभूत ‘सायफर प्रकरण' आहे तरी काय?

Jan 31, 2024 03:43 PM IST

सायफर हे मूळ टेलिग्राम पत्र किंवा फॅक्स सारखं एक पत्र असतं. ते अतिशय गुप्त समजलं जातं. हे पत्र फोडल्यास राष्ट्रहिताविरोधात गुप्त माहिती फोडणे समजले जाते. या गुन्ह्यासाठी कमाल १४ वर्ष शिक्षा किंवा मृत्यूदंडही ठोठावला जाऊ शकतं.

Pakistan's former Prime Minister Imran Khan
Pakistan's former Prime Minister Imran Khan (AFP)

पाकिस्तानात सध्या सार्वत्रिक निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. पाकिस्तानात सर्व प्रमुख राजकीय पक्षांचे नेते मोठमोठ्या सभांना संबोधित करताना दिसत आहेत. यात प्रामुख्याने पाकिस्तान मुस्लिम लिग नवाझ गट (Pakistan Muslim League (N) चे नेते, माजी पंतप्रधान नवाझ शरीफ, शरिफ यांचे बंधु आणि माजी पंतप्रधान शाहबाज शरिफ, शरिफ यांची कन्या मरियम नवाज, पाकिस्तान पीपल्स पार्टी (Pakistan People's Party) चे अध्यक्ष, माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो-झरदारी यांच्या ठिकठिकाणी लाखोंच्या सभा होत आहे. यंदाच्या पाकिस्तानच्या सार्वत्रिक निवडणुकांमधून एक चेहरा गायब दिसतोय, तो म्हणजे पाकिस्तान तहरिक इन्साफ ( Pakistan Tehreek-e-Insaf) या पक्षाचे अध्यक्ष आणि पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान हे होय. एप्रिल २०२२ मध्ये पाकिस्तानात घडलेल्या नाट्यमय राजकीय घडामोडीनंतर इम्रान खान यांना पंतप्रधानपद गमवावं लागलं होतं. त्यानंतर शाहबाज शरिफ यांच्या नेतृत्वाखाली सत्तेवर आलेल्या आघाडी सरकारने इम्रान खानवर भ्रष्टाचाराचे आरोप ठेवून अटक केली होती. त्यात इम्रानला तीन वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. त्यामुळे कोर्टाने इम्रान खानला निवडणूक लढण्यास अपात्र ठरवलं आहे. आता सध्या सायफर प्रकरणाची खूप चर्चा होतय. या प्रकरणात इम्रान खान आणि त्यांच्या काळात परराष्ट्र मंत्री असलेलेलश शाह मेहमूद कुरेशी यांना १० वर्ष कारावास ठोठावण्यात आला आहे. पाकिस्तानात येत्या ८ फेब्रुवारी रोजी सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदान होतय. मतदानाच्या नेमक्या दोन आठवडे आधी कोर्टाने इम्रान खान यांना सायफर प्रकरणात १० वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. इम्रान खान पंतप्रधानपदी असताना हे सायफर प्रकरण घडलं होतं. नेमकं हे सायफर प्रकरण काय आहे, ते जाणून घेऊ या.

सायफर म्हणजे काय?

इम्रान खान यांच्यावर २०२२ साली वॉशिंग्टनमधील पाकिस्तानच्या राजदूताने इस्लामाबादला पाठवलेलं एक गुप्त पत्र (classified cable) (ज्याला पाकिस्तानात सायफर अथवा सिफर म्हणतात) फोडल्याचा आरोप आहे. सायफर हे टेलिग्राम किंवा फॅक्ससारखंच असतं. त्यातली भाषा सांकेतिक असते. अशाप्रकारचे संदेश सार्वजनिक केले जात नाही. सायफर सार्वजनिक करण्यात आलं तर त्याचा कोड सुरक्षित होतो. ज्या सायफरवरून इम्रान खान यांना शिक्षा ठोठावण्यात आली आहे, ते परराष्ट्र सचिवांच्या नावानं आलं होतं आणि 'नॉन-सर्कुलेटिंग' स्वरुपाचं होतं. एप्रिल २०२२मध्ये इम्रान खान यांना पंतप्रधानपदावरून हटवल्यानंतर त्यांनी लगेचच अमेरिकेवर खळबळजनक आरोप केला होता. आपल्याला पंतप्रधानपदावरून हटवण्यामागे अमेरिकेचा हात असून पाकिस्तानी लष्कराने हातमिळवणी केल्याचा आरोप केला होता.

दरम्यान, ‘द इंटरसेप्ट’ या अमेरिकेतील एका वेबसाइटने ऑगस्ट २०२३ मध्ये प्रकाशित केलेल्या वृत्तानुसार अमेरिकेचं सरकार इम्रान खान यांना पंतप्रधानपदावरून हटवू इच्छित असल्याचे संकेत देण्यात आले होते. इंटरसेप्टने ७ मार्च २०२२ रोजी अमेरिकेतील पाकिस्तानचे माजी राजदूत असद मजीद खान आणि अमेरिकेतील दक्षिण आशिया आणि मध्य पूर्वेकडील देशांचा कारभार पाहणारे परराष्ट्र सचिव डोनाल्ड लू यांच्यातील संभाषणाचा तपशील प्रकाशित केला होता. इम्रान खान यांच्यावर ब्रिटिश काळात तयार करण्यात आलेल्या ऑफिशियल सीक्रेट अॅक्ट नुसार कारवाई केली जाऊ शकते. राष्ट्रीय हिताविरोधात गुप्त माहिती फोडणे, कारस्थान रचणे किंवा शत्रू किंवा दुसऱ्या देशाला संदेश देणे असा आरोप ठेवला जाऊ शकतो. या कायद्याच्या कलम तीन अंतर्गत गुन्हा सिद्ध झाल्यास कमाल शिक्षा १४ वर्ष किंवा मृत्यूदंडाची शिक्षा सुद्धा होऊ शकते. 

Whats_app_banner
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर