Mallikarjun Kharge on Income Tax action : इन्कम टॅक्स विभागानं काँग्रेस पक्षाची सर्व बँक खाती गोठवल्यानंतर राजकीय वातावरण तापलं आहे. काँग्रेस पक्षानं देशातील सत्ताधारी भाजप सरकारवर चौफेर हल्ला चढवला आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी या घटनाक्रमावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. भविष्यात देशात निवडणुकाच होणार नाहीत हे आम्ही म्हणूनच आतापर्यंत सांगत होतो, असं खर्गे यांनी म्हटलं आहे.
२०१८-१९ चं इन्कम टॅक्स रिटर्न फाइल करण्यास उशीर झाल्याच्या कारणास्तव इन्मक टॅक्स विभागानं ही कारवाई केली आहे, अशी माहिती काँग्रेसचे नेते अजय माकन यांनी आज दिली. मात्र, असा उशीर अनेकदा होत असतो. त्यासाठी अशी कारवाई करणं आश्चर्यकारक आहे. सार्वत्रिक निवडणूक घोषित होण्यासाठी अवघे काही दिवस उरले आहेत, याकडंही त्यांनी लक्ष वेधलं.
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी एक्स अकाऊंटवरून प्रतिक्रिया दिली आहे. 'सत्तेच्या नशेत असलेल्या मोदी सरकारनं लोकसभा निवडणुकीच्या आधी देशातील सर्वात मोठा विरोधी पक्ष असलेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची खाती गोठवली आहेत. हा लोकशाहीला मोठा धक्का आहे, असं खर्गे यांनी म्हटलं आहे.
'भाजपनं जमा केलेला असंवैधानिक पैसा निवडणुकीत वापरला जाईल, पण आम्ही क्राउडफंडिंगच्या माध्यमातून जमा केलेला पैसा सील केला गेला आहे. त्यामुळंच भविष्यात निवडणुका होणार नाहीत, असं आम्ही म्हटल आहे, असं खर्गे म्हणाले.
‘या देशातील बहुपक्षीय व्यवस्था वाचवण्यासाठी आणि भारताची लोकशाही सुरक्षित करण्यासाठी आम्ही न्यायव्यवस्थेला आवाहन करतो. या अन्याय आणि हुकूमशाहीविरुद्ध आम्ही रस्त्यावर उतरून जोरदार लढा देऊ,’ असा इशाराही त्यांनी दिला.
संबंधित बातम्या