मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Electoral Bonds : सुप्रीम कोर्टानं बंदी घातलेल्या निवडणूक रोख्यांतून भाजपला किती हजार कोटी मिळाले?

Electoral Bonds : सुप्रीम कोर्टानं बंदी घातलेल्या निवडणूक रोख्यांतून भाजपला किती हजार कोटी मिळाले?

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Feb 16, 2024 03:14 PM IST

Funds from Electoral Bonds : सर्वोच्च न्यायालयानं घटनाबाह्य ठरवलेल्या इलेक्ट्रोल बाँडचा आतापर्यंत भाजपला सर्वाधिक फायदा झाला आहे.

Funds from Electoral Bonds
Funds from Electoral Bonds

Funds from Electoral Bonds : राजकीय पक्षांच्या निवडणूक निधीसाठी सहा वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलेली इलेक्टोरल बाँडची योजना सर्वोच्च न्यायालयानं घटनाबाह्य ठरवली आहे. तसंच, आतापर्यंतची देणग्यांची सर्व आकडेवारी निवडणूक आयोगाकडं सुपूर्द करण्याचे निर्देश न्यायालयानं स्टेट बँकेला दिले आहेत. मात्र, त्याधीच निधीची आकडेवारी समोर आली आहे. त्यानुसार, केंद्रातील सत्ताधारी भाजपला गेल्या सहा वर्षांत इलेक्टोरल बाँडमधून सर्वाधिक निधी मिळाला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

२०१७-१८ मध्ये सुरू झालेल्या या योजनेच्या वार्षिक लेखापरीक्षण अहवालातून ही आकडेवारी समोर आली आहे. त्यानुसार, भाजपला गुप्त देणग्यांच्या रूपात सर्वाधिक ६५६६ कोटी रुपये मिळाले आहेत. प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेस दुसऱ्या स्थानावर आहे. सहा वर्षांत काँग्रेसला केवळ ११२३ कोटी रुपये मिळाले आहेत. ममता बॅनर्जींचा पक्ष तृणमूल काँग्रेस या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. अवघ्या एका राज्यात सत्तेत असलेल्या तृणमूल काँग्रेसला १०९२ कोटी रुपये मिळाले आहेत.

इलेक्टोरल बाँडद्वारे देणग्या न स्वीकारणारा सीपीआय (मार्क्सवादी) हा एकमेव राष्ट्रीय पक्ष आहे. यादीत चौथ्या क्रमांकावर नवीन पटनायक यांचा ओडिशातील सत्ताधारी बिजू जनता दल हा पक्ष आहे. या पक्षाला ७७४ कोटी रुपये देणगी म्हणून मिळाले आहेत. तामिळनाडूतील सत्ताधारी द्रमुकला निवडणूक रोख्यांद्वारे एकूण ६१५ कोटी रुपये मिळाले आहेत.

सलग १० वर्षे तेलंगणावर राज्य करणारा भारत राष्ट्र समिती (पूर्वीचा टीआरएस) या यादीत सहाव्या क्रमांकावर आहे. सहा वर्षांत एकूण बीआरएसला ३८३ कोटी रुपयांच्या निवडणूक देणग्या मिळाल्या आहेत. या यादीत वायएसआर काँग्रेस सत्ताधारी आंध्र प्रदेश सातव्या स्थानावर आहे. जगनमोहन रेड्डी यांच्या पक्षाला सहा वर्षांत एकूण ३८२ कोटी रुपये इलेक्टोरल बाँड्सद्वारे मिळाले आहेत. त्यांचे प्रतिस्पर्धी माजी मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांच्या टीडीपीला १४६ कोटी रुपये मिळाले आहेत. त्यांचा पक्ष यादीत आठव्या क्रमांकावर आहे.

शिवसेनेला किती मिळाले?

शिवसेना नवव्या क्रमांकावर आहे. या पक्षाला १०१ कोटी रुपये मिळाले आहेत, तर ९४ कोटी रुपये मिळवणारा आम आदमी पक्ष दहाव्या स्थानी आहे. पहिल्या दोन वर्षांत 'आप'ला एकही देणगी मिळाली नव्हती.

इतर पक्षांचं काय?

अखिलेश यादव यांच्या सपाला ४९ कोटी, नितीश कुमार यांच्या जेडीयूला २४ कोटी, लालू यादव यांच्या आरजेडीला २.५ कोटी, हेमंत सोरेन यांच्या जेएमएमला केवळ १ कोटी, तर एआयएमआयएमला ६, पंजाबमधील अकाली दलाला ७.२६ कोटी मिळाले आहेत. कर्नाटकच्या जेडीएसला १३ कोटी रुपये मिळाले आहेत.

IPL_Entry_Point