Baba Ramdev News: योगगुरू बाबा रामदेव यांनी पुन्हा एकदा जाहीर माफी मागितली आहे. पतंजली आयुर्वेदाशी संबंधित दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींबाबत त्यांनी लिहिले की, मी पुन्हा माफी मागतो. पतंजलीकडून माफी मागण्याची ही पहिलीच वेळ नाही. असाच माफीनामा मंगळवारीही त्यांनी मागितला होता. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने त्यावर आक्षेप घेतला घेत ही माफी पुरेशी नाही असे म्हटले होते.
'बिनशर्त सार्वजनिक क्षमायाचना' या शीर्षकासह बाबा रामदेव यांनी पेपरमधून जाहिरात प्रकाशित केली होती. नव्याने प्रकाशित झालेल्या माफीनाम्यात पतंजली आयुर्वेदाने म्हटले आहे की, 'माननीय सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याच्या (रिट याचिका ६४५/२०२२) संदर्भात, आम्ही सूचना/आदेशांचे पालन करत आहोत. माननीय सर्वोच्च न्यायालय आम्ही आमच्या चुकीचे तसेच गैर वर्तणाबद्दल कंपनीच्या वतीने वैयक्तिकरित्या तसेच सार्वजनिकरित्या जाहीरपणे माफी मागतो.
रामदेव बाबा यांनी माफीनाम्यात पुढे असे म्हटले आहे की, 'आम्ही २२ नोव्हेंबर २०२३ रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदे बद्दल देखील जाहीर आणि बिनशर्त माफी मागत आहोत. जाहिराती प्रसिद्ध करताना झालेल्या चुकीबद्दल आम्ही दिलगीर आहोत. अशा चुका पुन्हा होणार नाहीत असे वचन देतो. आम्ही माननीय न्यायालयाच्या आदेश आणि निर्देशांचे गांभीर्याने पालन करण्याचे वचन देतो. आम्ही न्यायालयाची प्रतिष्ठा राखण्याचे व माननीय न्यायालय/अधिकारी यांच्या सूचना व कायद्यांचे पालन करण्याचे वचन देतो, असे माफीनाम्यात म्हटले आहे.
विशेष बाब म्हणजे एक दिवसापूर्वी प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीत बाबा रामदेव आणि आचार्य बाळकृष्ण यांच्या नावाचा समावेश नव्हता. त्यानंतर सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती ए अमानुल्ला यांच्या खंडपीठाने माफीनामा ठळकपणे प्रसिद्ध केला आहे का, असा सवाल केला होता. न्यायमूर्ती कोहलीने विचारले, 'माफी ठळकपणे प्रसिद्ध झाली होती का? त्याचा फॉन्ट आणि आकार तुमच्या जुन्या जाहिरातींसारखे होते का?
सध्या या प्रकरणाची पुढील सुनावणी ही ३० एप्रिल रोजी होणार आहे. त्यानंतर बाबा रामदेव आणि आचार्य बाळकृष्ण यांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश कोर्टाने दिले आहे.