Rail Neer packaged drinking water bottles supply issue : रेल्वे स्थानकावर रेलनीर या बाटली बंद पाण्याच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे रेल्वे स्थानकावरील केटरर्सनी इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) विरुद्ध रेल्वे प्रशासनाकडे तक्रार केली आहे. आयआरसीटीसीने भर उन्हाळ्यात रेलनीरच्या पुरवठ्यात १ मे पर्यंत कपात केल्याने वेस्टर्न रेल्वे केटरर्स असोसिएशनने फक्त रेलनीरच्या विक्रीचाच आग्रह का ? असा सवाल करत इतर बाटलीबंद पाण्याची विक्री करण्यास परवानगी देण्याची मागणी केली आहे.
आयआरसीटीसीने रेलनीरचा पुरवठा कमी केल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि पुणे वगळता दादरच्या पलीकडे मध्यवर्ती मार्गावर, पनवेल वगळून हार्बर मार्गावरील सर्व स्थानके तसेच पश्चिम मार्गावरील वांद्रे टर्मिनसपासून ते सुरतपर्यंत सर्व स्थानकांवर रेल नीर पुढील काही दिवस मिळणार नाही. सध्या उन्हाळा सुरू आहे. त्यात स्थानकावर पाण्याची कमतरता असल्याने प्रवाशांची गैरसोय होणार आहे. त्यामुळे रेलनीरचा आग्रह न करता इतर बाटलीबंद पाण्याची विक्री करण्याची परवानगी देण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे.
पश्चिम रेल्वे केटरर्स असोसिएशनने रेल्वे अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनानुसार रेल्वे नीरच्या बाटलीबंद पाण्याच्या पुरवठ्यात वारंवार अडचणी येतात. अनेक वेळा रेलनीरचा बोटल्सचा अपुरा पुरवठा होतो. यामुळे प्रवाशांना पाणी पुरवठा करतांना विक्रेत्यांना अडचणीचा सामना करावा लागतो. मुंबईतील विविध रेल्वे स्थानकांवर सुमारे २७५ ते ३०० स्टॉल्स असलेले १५० हून अधिक सदस्य असलेल्या या असोसिएशनने सांगितले की, रेलनीरचा पुरवठा होत नसल्यामुळे प्रवासी आणि त्यांच्या असोसिएशनच्या भागधारक या दोघांचीही मोठी गैरसोय होत आहे. या बाबत अनेकवेळा तक्रारी करूनही रेल्वे प्रशासन आयआरसीटीसी विरुद्ध कोणतीही कारवाई करत नाही. रेल नीरचा पुरवठा न केल्यामुळे विक्रेत्यांचे आर्थिक नुकसान होत आहे, असे देखील त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
रेलनीर बाटलीबंद पाण्याचा पुरवठा बंद झाल्यास रेल्वेने मोठा दंड आकारावा, अशी मागणी देखील विक्रेत्यांच्या असोसिएशन केली आहे. “उन्हाळ्याच्या इतर ब्रँडच्या बाटलीबंद पाण्याची पर्यायी व्यवस्था करणे कठीण आहे. आम्ही आमच्या खिशातून फक्त जास्त पैसे देत नाही, तर आम्हाला गरजेपेक्षा जास्त क्रेट विकत घेण्यास भाग पाडले जाते, ”असे केटरिंग स्टॉल मालकाने सांगितले.
काही आयआरसीटीसीच्या अधिकाऱ्यांनी अंबरनाथ रेल नीर प्लांटमधील नियमित देखभालीच्या कामासाठी बाटलीबंद पाण्याच्या पुरवठा कमी झाल्याचे सांगितले. मात्र, रेलनीरचा अंबरनाथ येथील प्लांट दीर्घकाळ देखभालीसाठी बंद राहणे हे चुकीचे आहे. सूत्रांनी सांगितले की, प्लांटमधील हॉट फॉर्म लेबलिंग मशीन, जे दररोज एक-लिटर बाटल्यांचे १४,५०० कार्टन्स तयार करते, ते खराब झाल्याने रेलनीरच्या विक्रेत्यांच्या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे.
संबंधित बातम्या