Congress Rejected Ram Mandir Inauguration Invitation : अयोध्येतील राम मंदिरात २२ जानेवारी रोजी होणाऱ्या प्रभू रामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापासून दूर राहण्याचा निर्णय काँग्रेस पक्षानं घेतला आहे. काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी आणि अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी हे निमंत्रण नाकारलं आहे. काँग्रेसनं त्यासाठी कारणही दिलं आहे.
काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी या संदर्भात निवेदन प्रसिद्ध केलं आहे. त्यानुसार, सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खर्गे व काँग्रेसचे लोकसभेतील नेते अधीर रंजन चौधरी हे राम मंदिर सोहळ्यात उपस्थित राहणार नाहीत. हा संपूर्ण कार्यक्रम राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भारतीय जनता पक्षाचा असल्यामुळं पक्षानं हा निर्णय घेतल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
'आपल्या देशात लाखो लोक प्रभू रामचंद्राची पूजा करतात. धर्म ही वैयक्तिक बाब आहे. मात्र, आरएसएस व भाजपनं अयोध्येतील मंदिर ही अनेक वर्षांपासून राजकीय प्रयोगशाळा बनवून टाकली आहे. अजूनही बांधकाम अपूर्ण असलेल्या मंदिराचं उद्घाटन भाजप आणि आरएसएसच्या नेत्यांकडून केवळ निवडणुकीतील फायद्यासाठी होत आहे. हा निव्वळ भाजप आणि आरएसएसचा खासगी कार्यक्रम आहे. त्यामुळंच २०१९ च्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार आणि लाखो रामभक्तांच्या भावना लक्षात घेऊन काँग्रेस नेत्यांनी आदरपूर्वक हे आमंत्रण नाकारलं आहे, असं जयराम रमेश यांनी म्हटलं आहे.
अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनासाठी पक्षाच्या तीन नेत्यांना आमंत्रण मिळाल्याचं काँग्रेसनं सांगितलं होतं. योग्य वेळी निर्णय जाहीर करू, असंही पक्षानं स्पष्ट केलं होतं. त्यावर काँग्रेसनं आज भूमिका स्पष्ट केली आहे. काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी सोहळ्यात सहभागी होण्याबाबत सकारात्मकता दर्शवली होती. मात्र, पक्षानं आता वेगळा निर्णय घेतला आहे.
येत्या २२ जानेवारीला राम मंदिरात रामलल्लाच्या अभिषेकाचा कार्यक्रम होणार आहे. या सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह देशातील आणि जगातील सहा हजारांहून अधिक मान्यवर सहभागी होत आहेत. यात राजकारण, बॉलिवूड, क्रीडा, उद्योग व राम मंदिर आंदोलनाशी संबंधित लोकांचा समावेश आहे. श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्रातर्फे निमंत्रणं पाठवली जात आहेत.
संबंधित बातम्या