मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Rahul Narwekar Live: नार्वेकरांचा ठाकरेंना किंचित दिलासा; शिंदे गटाची ‘ही’ मागणी केली अमान्य
Eknath Shinde
Eknath Shinde

Rahul Narwekar Live: नार्वेकरांचा ठाकरेंना किंचित दिलासा; शिंदे गटाची ‘ही’ मागणी केली अमान्य

Ganesh Pandurang Kadam 03:44 PM ISTJan 10, 2024 09:14 PM
  • twitter
  • Share on Facebook

Shiv Sena MLA Disqualification case Live updates : शिवसेना आमदारांच्या अपात्रता प्रकरणाचा निकाल आला असून शिंदे गटाच्या आमदारांना अपात्र ठरविण्याची ठाकरे गटाची मागणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी फेटाळून लावली आहे.

Wed, 10 Jan 202403:42 PM IST

लोकशाहीची हत्या झाली वगैरे बोलणं उद्धव ठाकरेंना भाग आहे, गागावलेंचा टोला

आम्हाला अपात्र ठरवण्यासाठी ज्यांनी आटोकाट प्रयत्न केले त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरले आहेत. उद्धव ठाकरे आणि त्यांच्या गटातल्या लोकांना जे करायचं, जे म्हणायचं ते त्यांना करुद्या. आज लोकशाहीची हत्या झाली वगैरे असं काही बोलणं उद्धव ठाकरेंना बोलणं भाग आहे.

Wed, 10 Jan 202403:04 PM IST

आतातरी कुणाच्या मनात सरकारच्या स्थैर्याबाबत शंका राहण्याचे कारण नाही -फडणवीस

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वात राज्यात सरकार स्थापन करताना संवैधानिक आणि कायदेशीर प्रक्रियेचे संपूर्णत: पालन करण्यात आले होते आणि त्यामुळेच हे सरकार मजबूत आणि भक्कम आहे, असे आम्ही प्रारंभीपासूनच सांगत होतो. त्यामुळेच मा. सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा आपल्या आदेशात हे सरकार बरखास्त करण्याचा कुठलाही आदेश देण्याची गरज नाही, असे स्पष्ट केले होते.पण, काही लोक मुद्दाम आणि वारंवार सरकारबाबत गैरसमज पसरवून राज्यातील वातावरण अस्थिर करण्याचा प्रयत्न करीत होते. आज विधानसभाध्यक्षांनी विविध नियमांचा दाखला घेत, जो आदेश आज दिला, त्यानंतर आतातरी कुणाच्या मनात सरकारच्या स्थैर्याबाबत शंका राहण्याचे कारण नाही, असे फडणवीस म्हणाले आहेत.

Wed, 10 Jan 202401:34 PM IST

Uddhav Thackeray Faction : उद्धव ठाकरे गटाच्या आमदारांवर अपात्रतेची कारवाई नाही - राहुल नार्वेकर

एकनाथ शिंदे यांच्या गटानं उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या १४ आमदारांना अपात्र ठरवण्याची केलेली मागणी राहुल नार्वेकर यांनी फेटाळली आहे. या आमदारांना प्रत्यक्ष व्हीप बजावण्यात आला नव्हता. त्यामुळं त्यांना अपात्र ठरवता येणार नाही, असं नार्वेकर यांनी म्हटलं आहे.

Wed, 10 Jan 202401:30 PM IST

Aaditya Thackeray : आम्हाला निकाल अमान्य, सुप्रीम कोर्टात आव्हान देणार - आदित्य ठाकरे

शिवसेनेच्या संदर्भात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेला निकाल आम्हाला अमान्य आहे. या निकालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार, अशी प्रतिक्रिया ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी दिली आहे.

Wed, 10 Jan 202401:26 PM IST

Eknath Shinde Faction : शिंदे गटाची कृती अपात्रतेसाठी पुरेशी ठरत नाही - राहुल नार्वेकर

एकनाथ शिंदे गट संपर्काबाहेर होता. त्यामुळं त्यांना पक्ष सोडायचा होता हे सिद्ध होतं, हा ठाकरे गटाचा दावा राहुल नार्वेकर यांनी फेटाळला. संपर्कात नसणं या एका मुद्द्यावर आमदारांना अपात्र ठरवलं जाऊ शकत नाही. शिवाय, ठाकरे गटाचे दोन नेते एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करण्यासाठी गुवाहाटीला गेले होते. त्यामुळं शिंदे गट संपर्कात नव्हता यालाही पुरेसा आधार नाही. त्यामुळं ते अपात्रतेला पात्र ठरत नाहीत - राहुल नार्वेकर 

Wed, 10 Jan 202401:36 PM IST

Rahul Narwekar on Disqualification : बैठकीला अनुपस्थित राहणं म्हणजे पक्ष सोडला असं होत नाही - राहुल नार्वेकर

जून २०२१ मध्ये झालेल्या बैठकीसाठी शिंदे गटाच्या कोणत्याही आमदाराला व्हीप बजावण्यात आला नव्हता. सुनील प्रभू यांना व्हीप बजावण्याचा अधिकारच नव्हता. शिवाय, बैठकीला अनुपस्थित राहणं म्हणजे पक्ष सोडला असं होत नाही. त्यामुळं या आमदारांना अपात्र ठरवण्याची याचिका फेटाळली जात आहे - राहुल नार्वेकर

Wed, 10 Jan 202401:36 PM IST

Rahul Narwekar : पक्षात फूट पडल्यानंतर राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक घेतल्याचा कुठलाही पुरावा ठाकरे गटानं दिलेला नाही - राहुल नार्वेकर

पक्ष संघटनेत व विधिमंडळ पक्षात उभी फूट पडते तेव्हा दोन्ही बाजूचे नेते आपलाच पक्ष खरा असल्याचा दावा करू शकतात. मात्र, मूळ पक्ष कोणता हे ठरविण्यासाठी उद्धव ठाकरे गटानं राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक घेतल्याचा कोणताही पुरावा सादर केला नाही, असं राहुल नार्वेकर यांनी नमूद केलं.

Wed, 10 Jan 202401:36 PM IST

Rahul Narwekar : एकनाथ शिंदे यांनी सादर केलेले १९९९ ची पक्षाची घटनाच वैध - राहुल नार्वेकर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेली शिवसेनेची १९९९ ची घटनाच पक्षाची घटना वैध आहे, हे राहुल नार्वेकर यांनी मान्य केलं. २०१८ ची घटनाच वैध मानावी हा उद्धव ठाकरे गटानं केलेला दावा चुकीचा आहे. त्यामुळं खरी शिवसेना ठरविण्यासाठी २०१८ च्या घटनेचा आधारा घेता येणार नाही, असं राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केलं.

Wed, 10 Jan 202412:35 PM IST

Uddhav Thackeray  : पक्षप्रमुखांची इच्छा म्हणजे पक्षाची इच्छा होऊ शकत नाही - राहुल नार्वेकर

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत २०१३ व २०१८ साली पक्षांतर्गत निवडणुकाच झाल्या नाहीत. शिवसेनेच्या घटनेत शिवसेनाप्रमुख हे सर्वोच्च पद आहे. पक्षप्रमुख पद म्हणजे पक्षाचं अध्यक्षपद नाही. त्यामुळं पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सर्वाधिकार दिल्याचा युक्तिवाद मान्य करता येणार नाही. एकनाथ शिंदेंना गटनेते पदावरून काढण्याचा अधिकार उद्धव ठाकरेंना नव्हता. उद्धव ठाकरेंचे सर्वाधिकार ग्राह्य धरल्यास पक्षांतर्गत लोकशाहीला अर्थच राहणार नाही. कोणी त्यांच्या विरोधात आवाजच उठवू शकणार नाही, असं राहुल नार्वेकर म्हणाले.

Wed, 10 Jan 202412:11 PM IST

Shiv Sena Constitution : शिवसेनेच्या २०१८ च्या घटनेची निवडणूक आयोगाकडं नोंदच नाही - राहुल नार्वेकर

शिवसेनेची २०१८ ची सुधारित घटना वैध मानली जाऊ शकत नाही, कारण भारतीय निवडणूक आयोगाकडं त्याची नोंद नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, मी इतर कोणत्याही घटकावर अवलंबून राहू शकत नाही. निवडणूक आयोगाच्या नोंदीनुसार, शिवसेनेची १९९९ ची घटनाच मी वैध मानतो, असं नार्वेकर यांनी स्पष्ट केलं.

Wed, 10 Jan 202401:36 PM IST

Rahul Narwekar  : उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची २०१८ ची घटना अमान्य - राहुल नार्वेकर

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं निवडणूक आयोगाकडं सादर केलेल्या २०१८ च्या घटनेवर एकमत नाही. त्याबाबत मतमतांतरं आहेत. २०१८ साली पक्षांतर्गत निवडणुकाच झालेल्या नाहीत. त्यामुळं ती घटना मान्य करता येत नाही. २०२३ मध्ये निवडणूक आयोगाकडं दिलेली पक्षाची घटनाच ग्राह्य धरली जाईल, असं राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केलं.

Wed, 10 Jan 202401:36 PM IST

Rahul Narwekar : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचं निकाल वाचन सुरू

शिवसेना आमदाराच्या अपात्रता प्रकरणाचं निकाल वाचन सुरू झालं आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे निकाल वाचून दाखवत आहेत.

Wed, 10 Jan 202410:50 AM IST

Shiv Sena MLA Disqualification Verdict  : थोड्याच वेळात सुरू होणार निकाल वाचन

शिवसेना आमदारांच्या अपात्रता प्रकरणाच्या निकालाचं वाचन थोड्याच वेळात सुरू होणार आहे. दोन्ही गटांचे आमदार विधानभवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये पोहोचले आहेत.

Wed, 10 Jan 202410:29 AM IST

Sanjay Shirsat : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर योग्य तोच निकाल देतील - संजय शिरसाट

 विधानसभा अध्यक्षांनी निकाल काहीही दिला तरी त्या निकालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याची मुभा सर्वांना आहे. तसं झाल्यास विधानसभा अध्यक्षांना सर्वोच्च न्यायालयानं आपला निकाल कसा योग्य हे सिद्ध करावं लागणार आहे. त्यामुळं राहुल नार्वेकर हे स्वत: योग्य तोच निर्णय देतील, असा विश्वास शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी व्यक्त केला.

Wed, 10 Jan 202410:26 AM IST

Rashi Shukla Meets Devendra Fadnavis : निकालाच्या आधी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट

शिवसेना आमदारांच्या अपात्रेच्या प्रकरणाच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या नवनियुक्त पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. पोलीस महासंचालक पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांनी प्रथमच फडणवीसांची भेट घेतली. निकालाच्या पार्श्वभूमीवर कायदा-सुव्यस्थेबाबतही या बैठकीत चर्चा झाल्याचं समजतं.

Wed, 10 Jan 202410:21 AM IST

Shiv Sena MLA Disqualification Verdict : निकाल वाचणाचं लाइव्ह प्रक्षेपण केलं जाणार

शिवसेना आमदारांच्या अपात्रतेचा निकाल लवकरच जाहीर केला जाणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे निकालाचं वाचन करणार असून या निकाल वाचनाचं लाइव्ह प्रक्षेपण केलं जाणार आहे.

Wed, 10 Jan 202409:55 AM IST

Nitin Deshmukh : राहुल नार्वेकर यांची नार्को टेस्ट करा; ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख यांची मागणी

राज्यातील आमदारांच्या अपात्रतेचा निकाल आधीच ठरला आहे. भारतीय जनता पक्ष सांगेल तोच निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर देतील. नार्वेकर यांची नार्को टेस्ट केली तर सगळं सत्य बाहेर येईल, असा दावा ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख यांनी केला.

Wed, 10 Jan 202408:51 AM IST

Mahesh Shinde : १६ आमदारांना अपात्र ठरवणं ही खायची गोष्ट आहे का?; शिंदे गटाच्या आमदाराचा सवाल

शिवसेना आमदारांच्या अपात्रतेच्या निकालासंदर्भात शिवसेनेचे कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांनी मोठं विधान केलं आहे. राष्ट्रीय अध्यक्षानं फोन करून देखील एक सरपंच तीन वर्षे अपात्र होत नाही. तर १६ आमदारांना अपात्र करणं ही खायची गोष्ट आहे का?, असा सवाल त्यांनी केला आहे.

Wed, 10 Jan 202408:02 AM IST

Aaditya Thackeray  : संविधानाला धरून निकाल आला तर ४० गद्दार बाद होणार - आदित्य ठाकरे

शिवसेना आमदारांच्या अपात्रता प्रकरणाच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाला धरून निकाल आला तर ४० गद्दार बाद झाल्याशिवाय राहणार नाहीत. त्यापेक्षा वेगळा निकाल आला तर भाजपच्या नव्या संविधानाचं ते मिश्रण असेल, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.

Wed, 10 Jan 202408:00 AM IST

Rahul Narvekar : आजच्या निकालातून सर्वांना न्याय मिळेल - राहुल नार्वेकर

आमदार अपात्रतेच्या प्रकरणी सर्वांना न्याय मिळेल. घटनेच्या चौकटीला अनुसरूनच निकाल दिला जाईल, असं वक्तव्य विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केलं आहे.

Wed, 10 Jan 202407:51 AM IST

Eknath Shinde : मॅच फिक्सिंग असतं अध्यक्षांना दिवसा भेटलो नसतो; एकनाथ शिंदे यांचं राऊत यांना प्रत्युत्तर

संजय राऊत यांनी केलेल्या मॅच फिक्सिंगच्या आरोपाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज उत्तर दिलं. त्यांच्या पक्षाचे आमदार, विरोधी पक्षाचे लोक अध्यक्षांच्या केबिनमध्ये जेवले आहेत. आम्ही त्यावर कधी आक्षेप घेतला नाही. विधानसभा अध्यक्षांना आम्ही लपूनछपून भेटलो नाही. दिवसाउजेडी भेटलो. अधिकृत कामासाठी भेटलो. राहुल नार्वेकर हे स्वत: आमदार आहेत. त्यांच्या मतदारसंघातीलही काही कामं असतात, असं शिंदे म्हणाले.

Wed, 10 Jan 202407:51 AM IST

Eknath Shinde : निवडणूक आयोगानं आम्हाला अधिकृत मान्यता दिलीय; एकनाथ शिंदे यांचं सूचक वक्तव्य

Eknath Shinde on Disqualification Case : शिवसेना पक्ष म्हणून आम्हाला निवडणूक आयोगानं अधिकृत मान्यता दिली आहे. निवडणूक चिन्ह दिलं आहे. बहुमत आमच्याकडं आहे. त्यामुळं योग्य तो निर्णय होईल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

Wed, 10 Jan 202407:51 AM IST

Sanjay Raut on Shiv Sena Split Verdict : आजचा निकाल फिक्स असल्याचा संजय राऊत यांचा दावा

आमदारांच्या अपात्रतेच्या संदर्भात आज विधानसभा अध्यक्षांकडून दिला जाणारा निकाल आधीच फिक्स झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही तो माहीत आहे. हा निर्णय दिल्लीतून झाला आहे. नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखालील लवाद केवळ त्यावर शिक्कामोर्तब करणार आहे, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.

Wed, 10 Jan 202407:29 AM IST

Sushma Andhare : पुण्यातील शिवसैनिक दगडूशेठ हलवाई गणपतीला साकडे घालणार

आमदारांच्या अपात्रतेच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या नेतृत्वाखाली आज पुण्यातील स्थानिक पदाधिकारी व शिवसैनिक श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाला साकडं घालणार आहेत.

Wed, 10 Jan 202407:27 AM IST

Shiv Sena Disqualification Case : राज्यातील शिंदे सरकारचं भवितव्य आज ठरणार

Eknath Shinde Govt : शिवसेनेतील फुटीनंतर दोन्ही गटांनी एकमेकांच्या आमदारांवर केलेल्या अपात्रतेच्या कारवाईवर आज निर्णय येणार आहे. कोणाची कारवाई योग्य हे आज ठरणार असून त्यावर राज्यातील एकनाथ शिंदे सरकारचं भवितव्य ठरणार आहे.