मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  नागालँडमध्ये राष्ट्रवादीचा भाजपला पाठिंबा; सर्वच्या सर्व पक्ष सत्तेत, विरोधासाठी पक्षच उरला नाही!

नागालँडमध्ये राष्ट्रवादीचा भाजपला पाठिंबा; सर्वच्या सर्व पक्ष सत्तेत, विरोधासाठी पक्षच उरला नाही!

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Mar 08, 2023 03:54 PM IST

NCP Backs BJP in Nagaland : राष्ट्रवादीनं सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता नागालँडमध्ये विरोधकांविना विधानसभेचं कामकाज चालणार आहे.

NCP Support BJP In Nagaland
NCP Support BJP In Nagaland (HT)

NCP Support BJP In Nagaland : नागालँडच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे सात आमदार निवडून आले होते. भाजपा आणि एनडीपीपीच्या युतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर त्यांचं सरकार स्थापन होणार हे स्पष्ट असतानाच आता विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रवादीनंही भाजपला पाठिंबा देत सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात विरोधकांच्या एकीसाठी प्रयत्न करत असतानाच आता राष्ट्रवादीनं भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतल्यामुळं पवारांची मोठी राजकीय कोंडी होण्याची शक्यता आहे. याशिवाय नागालँडमधील राजकीय हालचालींचा परिणाम महाराष्ट्रातील राजकीय घडामोंडीवरही होणार असल्याचं बोललं जात आहे.

ट्रेंडिंग न्यूज

नागालँडमधील विधानसभेच्या निवडणुकीत निवडून आलेल्या सात आमदारांनी सत्तेत सहभागी होण्याची भूमिका घेतली होती. त्याला पक्षाध्यक्ष शरद पवार यांची संमती नसल्याचं वृत्त समोर आलं होतं. परंतु राजधानी कोहिमामध्ये राष्ट्रवादीच्या स्थानिक आणि राष्ट्रीय पातळीवर काही नेत्यांमध्ये बैठक पार पडली, त्यात भाजपला पाठिंबा देऊन सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय एकमतानं घेण्यात आला आहे. त्याबाबतचं एक पत्रकही राष्ट्रवादीकडून काढण्यात आलं आहे. नागालँडमध्ये भाजपा (१२) आणि एनडीपीपीला (२५) एकून ४० आमदारांचा पाठिंबा होता. त्यानंतर रिपाईच्या (आठवले गट) दोन आमदारांनीही सरकारला पाठिंबा दिला होता. त्यानंतर आता राष्ट्रवादीनंही सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतल्यानंतर नागालँडमध्ये विरोधी पक्षच उरलेला नाही. त्यामुळं त्यावरून राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

विधानसभेच्या निकाल लागल्यानंतर भाजपा आणि एनडीपीपीच्या आघाडीला सर्व अपक्ष आणि मित्रपक्षांनी पाठिंबा दिल्यामुळं केवळ राष्ट्रवादीच विरोधी पक्षातील सर्वात मोठा पक्ष होता. त्यानंतर आता राष्ट्रवादीनंही पाठिंबा दिल्यानंतर नागालँडमध्ये सर्वपक्षीय सरकार निर्माण झालं आहे. यापूर्वीदेखील नागालँडमध्ये सर्वपक्षीय सरकारं निर्माण झालेली आहेत. आता ही दुसरी वेळ आहे. परंतु राष्ट्रवादीनं भाजपाला पाठिंबा दिल्यामुळं त्याचा महाराष्ट्राच्या राजकारणावर मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

IPL_Entry_Point