मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Haryana Violence : हरयाणातील हिंसाचार थांबेना, गुरुग्राममध्ये धार्मिक स्थळाला आग लावून दंगलखोर फरार

Haryana Violence : हरयाणातील हिंसाचार थांबेना, गुरुग्राममध्ये धार्मिक स्थळाला आग लावून दंगलखोर फरार

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Aug 08, 2023 08:50 AM IST

Haryana Violence : अज्ञात आरोपींनी प्रार्थनास्थळाला आग लावत तेथील नागरिकांना मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Gurugram Haryana Violence
Gurugram Haryana Violence (HT)

Gurugram Haryana Violence : नूंह जिल्ह्यात शोभायात्रेत झालेल्या वादानंतर संपूर्ण हरयाणात हिंसाचार सुरू झाल्याच्या घटना समोर येत आहे. नूंह, फरिदाबाद आणि गुरुग्राममध्ये दोन्ही गटातील जमावाकडून एकमेकांवर जीवघेणे हल्ले करण्यात येत आहे. तीन जिल्ह्यातील हिंसाचारांच्या घटनांत आतापर्यंत सहा ते सात लोकांचा मृत्यू झाला असून किमान १०० लोक जखमी झाल्याची माहिती आहे. याशिवाय जमावाने शेकडो वाहनं पेटवून दिली असून पोलिसांवरही हल्ले केले आहे. त्यातच आता गुरुग्राममध्ये अज्ञात आरोपींनी एका धार्मिक स्थळाला आग लावत तेथील नागरिकांना मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गुरुग्रामच्या खांडसा गावात भल्या पहाटे ही घटना घडली आहे. त्यानंतर आता संपूर्ण गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

मिळालेल्या माहितीनुसार, हरयाणाच्या गुरुग्राम जिल्ह्यातील खांडसा गावात पहाटेच्या सुमारास अज्ञात आरोपींनी एका प्रार्थनास्थळाला आग लावल्याची माहिती हरयाणा पोलिसांनी दिली आहे. आरोपींनी लावलेल्या आगीत काही प्रार्थना सामग्री जळाली असून तेथील काही नागरिकांनाही आरोपींनी मारहाण केली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आहे. त्यानंतर पोलिसांनी वेळीच प्रसंगावधान राखत आग विझवली आहे. परिणामी मोठा अनर्थ टळला आहे. आग लावल्याच्या घटनेत कुणालाही इजा झालेली नाही. ज्या प्रार्थनास्थळात आरोपींनी आग लावली, त्यात हिंदू आणि मुस्लीम गेल्या अनेक वर्षांपासून दर्शनासाठी जात असल्याचं स्थानिक नागरिकांकडून सांगण्यात आलं आहे.

फरिदाबाद, नूंह आणि गुरुग्राम येथील हिंसाचाराच्या घटनांनंतर हरयाणातील अनेक ठिकाणी पोलिसांनी संचारबंदी लागू केली होती. याशिवाय जमावबंदी लागू करत पोलिसांकडून आरोपींची धरपकड सुरू करण्यात आली होती. याशिवाय स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी दंगलीतील आरोपींच्या घरावर पाडकामाची कारवाई केली होती. परंतु या घटनेची खुद्द हरयाणा-पंजाब हायकोर्टाने दखल घेत पाडकामाला स्थगिती दिली. त्यातच आता गुरुग्राममधील एका प्रार्थनास्थळाला आग लावण्यात आल्याने शहरात तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली आहे.

IPL_Entry_Point