भाजपकडून सर्व खासदारांना व्हीप जारी
महिला आरक्षण विधेयक, भाजपकडून सर्व खासदारांना व्हीप जारी
मोदी सरकारने आणलेला महिला आरक्षणावरील विधेयकावर लोकसभेत मतदान होणार आहे. त्यापूर्वीच भाजपने सर्व खासदारांना व्हीप जारी केला आहे. एनडीएतील घटकपक्षांनी देखील विधेयकाचा समर्थनार्थ भूमिका घेतली आहे.
अमित शहा लोकसभेत भाषण करणार
महिला आरक्षणावरील विधेयकावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा थोड्याच वेळात लोकसभेत भाषण करणार आहे. महिला आरक्षण, सबलीकरण आणि सशक्तीकरणावर अमित शहा मोदी सरकारची भूमिका मांडणार असल्याची माहिती आहे.
तृणमुलकडून महिला आरक्षण विधेयकाचं समर्थन
बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमुल कॉंग्रेस पक्षाने महिला आरक्षणावरील विधेयकाचं समर्थन केलं आहे. खासदार अभिषेक बॅनर्जी आणि डेरेक ओब्रायन यांनी विधेयकाचं समर्थन करत मोदी सरकारला पाठिंबा दिला आहे.
महिला आरक्षणाच्या विधेयकावर थोड्याच वेळात होणार मतदान
महिला आरक्षणाच्या विधेयकावर थोड्याच वेळात लोकसभेत मतदान होणार आहे. लोकसभेत बिल पास झाल्यास ते तातडीने मतदानासाठी राज्यसभेत पाठवलं जाणार आहे. विशेष अधिवेशनात प्रश्नोत्तरांचा तास नसल्याने विक्रमी वेळेत बिल पास होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
सोनिया गांधींचा मोदींना पाठिंबा, महिला आरक्षणावर म्हणाल्या...
कॉंग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी महिला आरक्षणाच्या मुद्द्यावर केंद्रातील मोदी सरकारला पाठिंबा दिला आहे. माझ्या आयुष्यातील हा भावूक क्षण आहे. त्यामुळं महिला आरक्षणावरील विधेयकाला पूर्णपणे पाठिंबा देत आहे. राजीव गांधी यांनी महिलांना आरक्षण देण्यासाठी प्रयत्न केले होते. त्यामुळं आता महिलांचं प्रतिनिधित्व वाढवण्यासाठी घेतलेल्या या निर्णयाला आमच्या पक्षाकडून पाठिंबा देण्यात येणार असल्याचं खासदार सोनिया गांधी यांनी म्हटलं आहे.
संसदेच्या कामकाजाला सुरुवात, सत्ताधारी-विरोधक पुन्हा आमने-सामने
संसदेतील विशेष अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवसाच्या कामकाजाला सुरुवात झाली आहे. महिला आरक्षणावरील विधेयकावर संसदेच्या दोन्ही सभागृहात आज मतदान होणार आहे. मंत्री निशिकांत दुबे सध्या सरकारची बाजू संसदेत मांडत आहेत.
अधिवेशनाचा तिसरा दिवस, कोणत्या मुद्द्यांवर होणार चर्चा?
parliament special session live updates : केंद्रातील मोदी सरकारने बोलावलेल्या संसदेच्या विशेष अधिवेशनाचा आजचा तिसरा दिवस आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत मांडलेल्या महिला आरक्षण विधेयकावर संसदेत मतदान होणार आहे. तसेच महिला आरक्षण, वन नेशन-वन इलेक्शन, समान नागरी कायदा आणि जीएसटी कपात यावर निर्णय होण्याची शक्यता आहे.
नव्या संसदेतील कामकाजाला सुरुवात
संसदेच्या विशेष अधिवेशनाचं कामकाज नव्या संसदेच्या इमारतीत सुरू झालं आहे. मंगळवार पासून कामकाज नव्या इमारतीत सुरू करण्यात आलं आहे. कामकाजाची इमारत बदललेली असली तरी सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या खासदारांची गोंधळ घालण्याची सवय कायम असल्याचं मंगळवारच्या कामकाजातून दिसून आलं.
महिला आरक्षणाच्या विधेयकावर आज मतदान होणार
संसदेच्या विशेष अधिवेशाचा आजचा तिसरा दिवस आहे. आजच्या दिवशी महिला आरक्षणाच्या विधेयकावर संसदेत मतदान होण्याची शक्यता आहे. लोकसभेत बिल पास झाल्यास ते राज्यसभेत चर्चा, मतदानासाठी जाणार आहे.