मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  नेतो फिराय गुहाटीला, टेन्शन घ्यायचं नाय गं, कुलदीप जाधवचं गाणं सुपरहिट

नेतो फिराय गुहाटीला, टेन्शन घ्यायचं नाय गं, कुलदीप जाधवचं गाणं सुपरहिट

Dilip Ramchandra Vaze HT Marathi
Jun 28, 2022 11:25 AM IST

आमदार शहाजीबापू पाटील (Shahajibapu Patil) यांचा ‘सारं ओक्के मध्ये आहे’ हा संवाद व्हायरल झाल्यावर आता त्याच संवादाला केंद्रस्थानी ठेवून गीतकार कुलदीप जाधव (Kuldeep Jadhav) यांनी आजच्या राजकीय परिस्थितीवर लिहिलेलं गाणं चांगलंच व्हायरल झालं आहे.

कुलदीप जाधव यांचं गाणं सोशल मिडियावर सुपर हिट
कुलदीप जाधव यांचं गाणं सोशल मिडियावर सुपर हिट (हिंदुस्तान टाइम्स)

२० जून रोजी राज्यात राजकीय भूकंप झाला आणि त्यानं शिवसेना (Shiv Sena) अगदी मुळापासून हलली. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) नावाच्या वादळानं मग शिवसेनेला पाडलेलं खिंडार सारं काही औक्के नसल्याची साक्ष देऊ लागलं. एकनाथ शिंदे यांनी पाडलेल्या भगदाडातून मग शिवसेनेचा एक एक मोहरा जो काल पर्यंत उद्धव ठाकरे (Uddhav Tackeray) यांच्या हातात हात देऊन आपण शिवसेनेबरोबर आहोत याची साक्ष देत होता, तो एक एक आमदार एकनाथ शिंदे यांच्या गटाला सामिल होत गेला. नेमकं काय चाललंय हे कळायच्या आत शिवसेना पक्ष फक्त नावापुरता उरला. त्यातच आधी सुरत (Surat) इथं हलवलेलं आपलं बस्तान मग एकनाथ शिंदे यांनी आसामच्या गुवाहाटीत (Guwahati) हलवलं. त्याचसोबत त्यांचे सारे अनुयायी बॅगा भरुन गुवाहाटीच्या रॅडिसन ब्लू (Radison Blue) या हॉटेलमध्ये पोहोचले. त्यानंतर आमदार शहाजीबापू पाटील यांच्या आपल्या कार्यकर्त्याशी साधलेला संवाद चांगलाच व्हायरल झाला. त्यात शहाजीबापू म्हणतात, “काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल, सारं ओक्के हाय”.

ट्रेंडिंग न्यूज

आता याच व्हायरल संवादावर एक गाणं करण्यात आलं आहे. या गाण्यात त्या आमदारांना प्रेयसीची उपमा देण्यात आली आहे.

"नेतो फिराय गुहाटीला, तू टेन्शन घ्यायचं नाय गं,

काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल, सगळं ओक्के मध्ये हाय ग"

सचिन जाधव यांनी गायलेलं हे गाणं आता मात्र सोशल मिडियावर चांगलंच व्हायरल होत आहे.राज्याच्या आमदारांची ही हॉटेल वारी आणि त्या हॉटेलातला थाट कुलदीप जाधव यांनी नेमक्या शब्दात मांडला आहे. त्याचसोबत शिवसेनेततून फुटून एका मागोमाग एक रोज त्या आलिशान हॉटेलमध्ये जाणारे आमदार याचं नेमकं वर्णन कुलदीप शिंदे यांनी केलं आहे. आपल्या गाण्याच्या पुढच्या ओळीही कुलदीप जाधव यांनी नेमक्या शब्दात लिहिल्या आहेत.

"तू माझ्या मी तुझ्या हाताला धरुन,

चल आणतो तुला गुवाहाटी फिरुन

मी राघू तू मैनाै तिथं अडचण कुणाची नायगं

काय झाडी काय डोंगर काय हॉटेल सगळं ओक्के मध्ये हाय ग"

आता हॉटेलमध्ये पोहोचल्यावर प्रियकर प्रेयसी नेमकं काय म्हणतील, तर त्या निसर्गरम्य वातावरणात फिरताना मजा येईल. हिरव्या पानामध्ये प्रेमाला बहर चढेल आणि बबड्या आणि बबडी त्या वातावरणात मनमुराद आनंद लुटतील असं काहीसं गाण्याच्या पुढच्या ओळी सांगत आहेत.

"तू बबडी माझी, मी बबड्या तुझा गं

झाडी डोंगरात फिरुन येईल मजा ग

हिरव्या हिरव्या पानामधी उमलतीया जाई ग

काय झाडी काय डोंगर काय हॉटेल सगळं ओक्के मध्ये हाय ग"

आणि शेवटी कुलदीप जाधव यांनी या आमदारांच्या नेमक्या मर्माला हात घातला आहे. आपलं आपण जमवलं आहे खरं. मात्र लग्न लागेस्तोवर म्हणजेच नेमकं कोणाबरोबर जायचं, राज्यात कुणाशी युती करायची, शिवसेनेच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आणायचा की नाही, आणलाच तर त्यापुढे आपली युती कोणाबरोबर करायची हे फिक्स होई पर्यंत तू तुझं बघ माझं मी बघेन असं कुलदीप जाधव लिहितात. मात्र टेन्शन घ्यायचं कारण नाही कारण आपल्या पाठीशी पाटील (एकनाथ शिंदे ) उभा आहे. त्यामुळे काय झाडी काय डोंगर काय हाटेल, सारं ओक्के मध्ये हाय गं असंही कुलदीप जाधव नेमक्या शब्दात मांडतात.

"तू तुझं बघ माझ मी बघेन

पुढचं पुढे बघू फिक्स झाल्यावर लगीन

पाटील पाठिशी उभा हायगं

काय झाडी काय डोंगर काय हॉटेल सगळं ओक्के मध्ये हाय ग"

आता कुलदीप आणि सचिन जाधव यांनी बनवलेलं गाणं सोशल मिडियावर चांगलंच व्हायरल होत असताना काय झाडी काय डोंगर काय हॉटेल सगळं ओक्के आहे अशा आशयाचे टी शर्टही बाजारात विक्रीला आलेले पाहायला मिळत आहेत.

 

<p>काय झाडी काय डोंगर काय हॉटेल चे टी शर्टही बाजारात</p>
काय झाडी काय डोंगर काय हॉटेल चे टी शर्टही बाजारात (हिंदुस्तान टाइम्स)

एकंदरीत राज्यात सारं ओक्के नसलं तरी सोशल मिडियावर मात्र सारं ओक्के मध्ये हाय गं. तेव्हा राज्याचं समिकरण काहीही असो, राज्यात राजकीय भूकंप कितीही बसले तरी सोशल मिडिया मात्र सारं ओक्के मध्ये हाय रं.

IPL_Entry_Point