Rajyasabha Election : कर्नाटकात कॉंग्रेसने फोडले भाजपचे २ आमदार; भाजपच्या कोट्याधीश उमेदवाराचा पराभव-in karnataka ruling congress secures 3 bjp fails to win second rajya sabha seat ,निवडणुका बातम्या
मराठी बातम्या  /  निवडणुका  /  Rajyasabha Election : कर्नाटकात कॉंग्रेसने फोडले भाजपचे २ आमदार; भाजपच्या कोट्याधीश उमेदवाराचा पराभव

Rajyasabha Election : कर्नाटकात कॉंग्रेसने फोडले भाजपचे २ आमदार; भाजपच्या कोट्याधीश उमेदवाराचा पराभव

Feb 29, 2024 04:36 PM IST

कर्नाटकात राज्यसभेच्या चार जागांसाठी काल झालेल्या निवडणुकीत सत्ताधारी कॉंग्रेसने भाजपच्या दोन आमदारांना फोडल्याची घटना घडली. परिणामी भाजप समर्थित कोट्याधीश बिल्डर डी. कुपेंद्र रेड्डी यांचा या निवडणुकीत पराभव पत्करावा लागला.

Karnataka deputy chief minister D K Shivakumar with newly-elected Congress Rajya Sabha MPs Syed Naseer Hussain, GC Chandrashekar, Ajay Makhan and others, at Vidhana Soudha in Bengaluru on Tuesday. (PTI)
Karnataka deputy chief minister D K Shivakumar with newly-elected Congress Rajya Sabha MPs Syed Naseer Hussain, GC Chandrashekar, Ajay Makhan and others, at Vidhana Soudha in Bengaluru on Tuesday. (PTI)

कर्नाटकात राज्यसभेच्या चार जागांसाठी काल निवडणूक झाली. या निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाचे अजय माकन, सय्यद नसीर हुसेन आणि जी. सी. चंद्रशेखर, हे तीन उमेदवार राज्यसभेवर निवडून आले आहे. तर भाजपचे नारायण भांडगे हे राज्यसभेवर निवडून आले. मात्र कर्नाटकात काल भाजपचे दोन आमदार फुटल्याने भाजपचे राज्यसभेचे दुसरे उमेदवार डी. कुपेंद्र रेड्डी यांना मात्र पराभव पत्करावा लागला. भाजपच्या एका आमदाराने पक्षाच्या आदेशाचे उल्लंघन करत कॉंग्रेस उमेदवाराला मतदान केले, तर भाजपचा दुसरा आमदार मतदानासाठी अनुपस्थित राहिला होता. कर्नाटकात भाजप- एचडी देवगौडा यांच्या जनता दल (सेक्युलर) या आघाडीने पाचवा उमेदवार उभा केल्याने ही निवडणूक रंजक बनली होती. दरम्यान, ऐन लोकसभेच्या तोंडावर कर्नाटकात राज्यसभा निवडणुकीत घडलेल्या या घडामोडीमुळे भाजप आणि जनता दल (सेक्युलर) च्या युतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या दोन्ही पक्षांनी लोकसभा निवडणूक एकत्रित लढविण्याचा निर्णय जाहीर केला होता.

भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएने कर्नाटकात राज्यसभा निवडणुकीत एक अतिरिक्त उमेदवार उभा केल्यामुळे मतदानाच्या वेळी उलथापालथ घडण्याची शक्यता वर्तवण्यात येत होता. खासकरून काँग्रेसचे काही आमदार भाजप समर्थित उमेदवाराला क्रॉस व्होटिंग करतील, अशी अटकळ बांधली जात होती. पण घडले उलटेच. बेंगळुरू शहरांतर्गत येणाऱ्या यशवंतपूर विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार एस. टी. सोमशेखर यांनीच काँग्रेस उमेदवाराला क्रॉस व्होटिंग केल्याचे उघड झाले आहे. तर उत्तर कन्नड जिल्ह्यातील येल्लापूर मतदारसंघातील भाजपचे आणखी एक आमदार ए. शिवराम हेब्बर हे कालच्या मतदानाच्यावेळी उपस्थित राहिले नाही. भाजपच्या नेत्यांनी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचा फोन बंद येत होता, असं सूत्रांनी सांगितले.

कर्नाटक राज्यसभा निवडणुकीत एकूण २२३ आमदारांपैकी २२२ आमदारांनी मतदान केले. राज्यसभा निवडणुकीत विजयासाठी एका उमेदवाराला ४५ मतांची गरज होती. कॉंग्रेसचे अजय माकन आणि हुसेन यांना प्रत्येकी ४७ मते मिळाल्याने ते विजयी झाले. कॉंग्रेसचे तिसरे उमेदवार चंद्रशेखर यांना ४५ मते मिळाल्याने ते विजयी झाले. कॉंग्रेस पक्ष आणि मित्रपक्षांचे मिळून एकूण १३४ आमदार होते. मात्र अपक्ष आणि भाजपचे सोमशेखर यांचे मत पकडून कॉंग्रेसच्या पारड्यात पाच अतिरिक्त आमदारांचे मत पडले. भाजपचे नारायण भांडगे यांना भाजपकडून ४७ मते मिळाल्याने ते विजयी झाले. परंतु भाजप आणि जेडीएसचे संयुक्त उमेदवार उद्योगपती डी. कुपेंद्र रेड्डी यांना केवळ ३६ मते मिळाल्याने त्यांचा पराभव झाला. कुपेंद्र हे कर्नाटकातील बलाढ्य बिल्डर असून त्यांनी निवडणूक शपथपत्रात १२०० कोटीच्या संपत्तीचे मालक असल्याचे जाहीर केले होते. राज्यसभा निवडणुकीत हा त्यांचा सलग तिसरा पराभव आहे.

कर्नाटकात भाजप उमेदवाराचं मत ठरलं कॉंग्रेससाठी बोनस!

कर्नाटकात कॉंग्रेसला चार अपक्ष आमदार समर्थन करतील असा पक्षा नेत्यांना विश्वास होता. परंतु भाजप आमदार सोमशेखर यांचे मत आमच्यासाठी बोनस ठरले, असं एका काँग्रेस नेत्याने सांगितलं. सोमशेखर मतदानासाठी विधानसभा परिसरात दाखल होताच मोठा गोंधळ उडाला होता. त्यांनी भाजपचे मुख्य व्हिप दोडाण्णागौडा जी. पाटील यांना चकवा दिला. आपल्या मतदारसंघासाठी जे योग्य आहे त्यासाठी विवेकाच्या आधारे मत दिलं असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सोमशेखर यांचे आभार मानले. कर्नाटकात क्रॉस व्होटिंग फक्त भाजपमध्येच शक्य असल्याचं सिद्धरामय्या यांनी सांगितले.

दरम्यान, भाजप- जेडीएस पक्षात गेल्या सप्टेंबरमध्ये युती जाहीर झाल्यानंतर या दोन्ही पक्षांना महिनाभरात दुसऱ्यांदा हा दुसरा पराभव पत्करावा लागला आहे. यापूर्वी शिक्षक मतदार संघातून विधान परिषदेच्या एकमेव जागेसाठी नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भाजप-जेडीएस आघाडीचा पराभव झाला होता.

संबंधित बातम्या