UP Crime News :उत्तरप्रदेश राज्यातील बलिया येथून एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे. येथे एका लग्न समारंभात एका तरुणीने नवरदेवाच्या अंगावर ॲसिड फेकण्यात आले. या घटनेत नवरदेव गंभीररित्या जखमी झाला असून त्याला तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरू असून ॲसिड फेकणाऱ्या तरुणीला गावातील महिलांनी पकडून चांगलाच चोप दिला.
ही घटना बांसडीह पोलीस ठाणे क्षेत्रातील डुमरी गावातील आहे. मिळालेल्या माहितीनुसार राकेश बिंद याचे या तरुणीसोबत मागील अनेक वर्षापासून प्रेमसंबंध होते. तरुणी त्यांच्यावर लग्नासाठी दबाव टाकत होती. मात्र राकेश तिच्यासोबत लग्न करण्यास टाळाटाळ करत होता. यावरून अनेक वेळा पोलीस केस व गावात पंचायतही बोलावली होती. मात्र प्रकरण मिटले नव्हते. दरम्यान तरुणाच्या घरच्या लोकांनी त्याचे लग्न दुसरीकडे ठरवले होते. यावरून प्रेयसी नाराज होती.
राकेश बिंद याचे लग्न मंगळवारी (२३ एप्रिल) रोजी होते. सायंकाळच्या वेळी वऱ्हाड येण्याच्या आधी काही विधी केले जात होते. त्यावेळी त्याच गावातील प्रेयसी चेहऱ्यावर पदर घेऊन लग्न मंडपाच पोहोचली. तिने नवरदेव राकेशच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ फेकला. यामुळे मांडवात गोंधळ निर्माण झाला. राकेशच्या चेहऱ्या भाजल्यामुळे त्याला तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. इकडे लग्न घरातील महिलांनी तरुणीला पकडून या घटनेची पोलिसाना माहिती दिली. त्यानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी आरोपी तरुणीला ताब्यात घेतले आहे.
याप्रकरणी बांसडीह रोड पोलीस चौकीचे प्रभारी निरीक्षक अखिलेश चंद्र पांडे यांनी सांगितले की, प्रकरणाचा तपास केला जात आहे. तरुणीला महिलांनी पकडल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामध्ये दिसते की, काही महिला तरुणीला पकडून नेत आहेत. महिला तिच्या केसांना पकडून रस्त्यावरून नेत आहेत. पोलीस अधीक्षक ए. के. झा यांनी सांगितले की, तरुणीने नवरदेवाच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ फेकल्याचे प्रकरण समोर आले आहे. यावेळी लग्न मंडपात उपस्थित असलेल्या गावातील अन्य एकाला भाजले आहे. तरुणीला ताब्यात घेऊन तिची चौकशी केली जात आहे. दाखल तक्रारीनुसार याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.