Border Dispute : सोलापुरात कर्नाटक भवन उभारणार; मुख्यमंत्री बसवराज बोम्मईंची घोषणा
Karnataka Bhavan In Solapur : काही दिवसांपूर्वीच कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्रातील सोलापूर, जत आणि अक्कलकोट या तीन शहरांवर दावा ठोकला होता.
Maharashtra-Karnataka Border Dispute : महाराष्ट्रातील सोलापूर, जत आणि अक्कलकोट या तीन शहरांवर दावा ठोकल्यानंतर आता सोलापुरात कर्नाटक भवन उभारण्याची घोषणा कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केली आहे. त्यासाठी दहा कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून लवकरच या भवनाचं काम सुरू केलं जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. त्यामुळं आता गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र आणि कर्नाटकात सुरू झालेल्या सीमावादाच्या मुद्द्यावरून आणखी राजकीय वादंग पेटण्याची शक्यता आहे.
ट्रेंडिंग न्यूज
मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील सोलापूरसह केरळ आणि गोव्यातही कर्नाटक भवन उभारण्याची घोषणा मुख्यमंत्री बोम्मई यांनी केली आहे. सोलापुरात कर्नाटक भवन उभारण्यासाठी कर्नाटक सरकारनं दहा कोटी रुपयांची तरतूदही केली असल्याची माहिती आहे. त्यामुळं आता सीमावादाच्या प्रश्नावरून शिंदे-फडणवीस सरकारच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वीच सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील काही गावांनी विकासकामांच्या मुद्द्यांवर महाराष्ट्रातून बाहेर पडत कर्नाटकमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सीमावादाची कायदेशीर लढाई लढण्यासाठी दिल्लीत काही विधिज्ञांची भेट घेतली होती. त्यानंतर आता त्यांनी सोलापुरात महाराष्ट्र भवन उभारण्याची घोषणा केली आहे.
कर्नाटकातील बेळगाव, निपाणी, कारावार, भालकी आणि बिदर या मराठीभाषिक प्रांताचा महाराष्ट्रात समावेश करण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्र सरकार न्यायालयीन लढा लढत आहे. या प्रांतावरून सीमावादाचा प्रश्न धगधगत असतानाच कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्रातील तीन शहरांवर दावा केल्यानं आगामी काळात महाराष्ट्र आणि कर्नाटकातील सीमावादाचा प्रश्न आणखी चिघळण्याची शक्यता आहे.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कर्नाटकच्या दाव्यांवर आणि सीमावादाच्या प्रश्नावर अजूनही भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यामुळं कॉंग्रेससह राष्ट्रवादी आणि शिवसेनेनंही मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे. याशिवाय येत्या काही दिवसांत दोन्ही राज्यातील सीमावादाच्या प्रश्नावर सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार असल्यानं कोर्ट या प्रकरणात काय निकाल देणार, याकडेही सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.