मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Uddhav Thackeray : ‘कर्नाटकनं तलावात पाणी सोडलं अन् शिंदे सत्तेच्या पाण्याखाली गटांगळ्या खातायंत’

Uddhav Thackeray : ‘कर्नाटकनं तलावात पाणी सोडलं अन् शिंदे सत्तेच्या पाण्याखाली गटांगळ्या खातायंत’

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Dec 03, 2022 04:18 PM IST

Uddhav Thackeray : कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी राज्यातील तीन शहरांवर दावा ठोकला आहे. याशिवाय काही गावांनी महाराष्ट्र सोडून कर्नाटकात सामील होण्याची तयारी केल्यानं उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री शिंदेंवर टिकास्त्र सोडलं आहे.

Uddhav Thackeray On Eknath Shinde
Uddhav Thackeray On Eknath Shinde (HT)

Uddhav Thackeray On Eknath Shinde : कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्रातील अक्कलकोट, जत आणि सोलापूर या तीन शहरांवर दावा ठोकल्यानं राजकीय वादंग पेटलं होतं. त्यानंतर सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील काही गावांनी विकासकामांच्या मुद्द्यावरून कर्नाटकात जाण्याची तयारी करत त्यासंदर्भातील ठराव पास केला होता. त्यानंतर आता याच मुद्द्यावरून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका केली आहे.

सेवालाल महाराजांचे वंशज अनिल राठोड यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. यावेळी मातोश्रीवर पार पडलेल्या कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, सीमावादाच्या मुद्द्यावरून कर्नाटकचे मुख्यमंत्री आक्रमक होत असतील तर आपले मुख्यमंत्री शांत का आहेत?, त्यांनी सत्तेसाठी कामाख्या देवीकडे नवस केला होता, बेळगावच्या प्रश्नासाठी ते गुवाहाटीला जाऊन कधी नवस करणार आहेत?, कर्नाटकनं आपल्या राज्यातील तलावांमध्ये पाणी सोडलं असून राज्यातील सत्ताधारी मात्र सत्तेच्या पाण्याखाली गटांगळ्या खात असून या नेभळटपणाविरुद्ध सर्वांनी एकत्र यायला हवं, असं म्हणत ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका केली आहे.

आजच्या वर्तमानपत्रात मी वाचलं आहे की, महाराष्ट्रातील मंत्र्यांना कर्नाटकात मज्जाव केला जात आहे. परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत कोणतंही वक्तव्य केलेलं नाही, असं म्हणत त्यांनी सरकारवर टीका केली आहे.

भाजपातील छत्रपतीप्रेमी एकत्र आलेत- ठाकरे

छत्रपती शिवाजी महाराजांचा सातत्यानं अपमान करण्यात येत आहे. त्यामुळं भाजपातील छत्रपतीप्रेमींनी एकत्र यावं, असं आवाहन मी यापूर्वी केलं होतं. परंतु आता खासदार उदयनराजे भोसलेंनी घेतलेल्या भूमिकेचं मी स्वागत करतो. महाराष्ट्रातील गद्दारीची तुलना छत्रपतींच्या आग्र्यातील सुटकेशी केली जातेय आणि तरीसुद्धा अशा लोकांवर कारवाई केली जात नसेल तर या लोकांना महाराष्ट्र काय आहे, हे दाखवून देण्याची वेळ आल्याचं सांगत उद्धव ठाकरेंनी शिंदे-फडणवीसांना टोला लगावला आहे.

IPL_Entry_Point