Chandrayaan-3 live updates : भारताच्या चांद्रयान ३ ला चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरून जवळपास एक महिना होत आहे. पहिल्या १४ दिवसांमध्ये चांद्रयानने आवश्यक माहिती गोळा केली होती. त्यानंतर १४ दिवसांची रात्र होणार असल्याने चांद्रयान स्लीप मोडमध्ये गेलं होतं. त्यानंतर आता सूर्याचा प्रकाश पडताच चांद्रयान चार्ज होण्यास सुरुवात होण्याची शक्यता आहे. चांद्रयान चार्ज झाल्यास त्यातून विक्रम लँडर बाहेर येणार आहे. परंतु आता १४ दिवसांच्या स्लिपिंग मोडमधून चांद्रयान बाहेर येणार का?, १४ दिवसानंतर यान सक्रिय होणार का?, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं वैज्ञानिकांकडून देण्यात आली आहे.
प्रज्ञान रोव्हर आणि विक्रम लँडरला आज इस्त्रोकडून सक्रिय करण्यात येणार आहे. रोव्हरवरील सोलर पॅनेल चार्ज झाल्यास रोव्हर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरचा प्रवास पुन्हा एकदा सुरू करणार आहे. लँडर आणि रोव्हरला सक्रिय करण्याचा प्रयत्न केला जाणार असून त्यामुळं चंद्राची आणखी माहिती आपल्याला मिळणार आहे. परिणामी त्याबद्दलच्या संशोधनाला आणखी गती मिळणार असल्याचं इस्त्रोचे संचालक नीलेश देसाई यांनी पीटीआयशी बोलताना सांगितलं आहे. चंद्रावर रात्रीच्या वेळी तापमान हे उणे २०० पर्यंत जात असल्याने आम्ही लँडर आणि रोव्हरला स्लिपिंग मोडमध्ये ठेवलं होतं. त्यामुळं येत्या २२ सप्टेंबर पर्यंत लँडर आणि रोव्हर सूर्यप्रकाशामुळं चार्ज होतील, अशी आशा असल्याचंही देसाई यांनी म्हटलं आहे.
इस्त्रोच्या चांद्रयान ३ ने मागच्या महिन्यात २३ तारखेला चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीरित्या लँडिंग केलं होतं. त्यानंतर १४ दिवस रोव्हरने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील मातीचं परीक्षण केलं होतं. चंद्राच्या साउथ पोलवर सॉफ्ट लँडिंग करणारा भारत जगातील पहिला देश बनला होता. १४ दिवसांच्या संशोधनात चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सल्फर आढळून आल्याची माहिती इस्त्रोकडून देण्यात आली आहे. तसेच धातू आणि ऑक्सिजनचं प्रमाणही आढळून आल्याचं वैज्ञानिकांकडून सांगण्यात आलं आहे.
संबंधित बातम्या